Wakad Crime News : फ्लिपकार्ट कंपनीचा विश्वासघात करणाऱ्या 25 ग्राहकांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – फ्लिपकार्ट कंपनीकडून ब्रँडेड वस्तू मागवून त्या वस्तू आल्यानंतर मागवलेल्या वस्तूच्या जागी बनावट वस्तू ठेऊन कंपनीला परत पाठवण्याचे प्रकार थेरगाव मधील डांगे चौकात घडले. ही बाब फ्लिपकार्ट कंपनीच्या निदर्शनास आल्याने कंपनीने याचा तपास करून जाणीवपूर्वक असे वर्तन करून कंपनीची फसवणूक करणा-या 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राजू भाई, अनिल रावत, रोहित सोनवणे, पुनित चावळेकर (सौरभ जगदीश नामदेव), आणि अन्य 21 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुतिन चावळेकर याला अटक केली आहे. याप्रकरणी गुलाब शंकर काटे (वय 39, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी शनिवारी (दि. 23) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 27 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर 2021 या कालावधीत डांगे चौक, वाकड येथे घडला. अॅपल कंपनीचे एअरपोड वायरलेस, वायरसह, चार्जरसह तसेच वन प्लस ब्ल्यूटुथ हेड सेट या वस्तू 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान आरोपींनी डांगे चौक, थेरगाव येथे फ्लिपकार्ट डॉट कॉम या वेबसाईटवरून मागवल्या.

त्यामध्ये आरोपींनी एकूण चार लाख 98 हजार रुपयांचे अॅपल कंपनीचे एअरपोड प्रो, वायरलेस चार्जर 20 नग, तीन लाख 57 हजार 600 रुपयांचे अॅपल कंपनीचे एअरपोडवायर चार्जर 24 नग, 79 हजार 840 रुपयांचे वन प्लस ब्ल्यूटुथ हेडसेट 16 नग असे एकूण नऊ लाख 35 हजार 440 रुपयांचे साहित्य मागवले.

वस्तू मागवून आरोपींनी त्या परत केल्या. कंपनीने आरोपी ग्राहकांना त्यांनी मागवलेल्याच वस्तू दिल्या होत्या, मात्र आरोपींनी खोडसाळपणे मागवलेल्या वस्तूंच्या जागी बनावट वस्तू ठेऊन त्या परत केल्या आणि कंपनीची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.