Chinchwad : सरकारी कामाचे टेंडर मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेची 25 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सरकारी कामाचे टेंडर मिळवून देण्याचे तसेच भिशीमध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेकडून लाखो रुपये घेतले. त्यानंतर कोणतेही टेंडर न देता महिलेची 25 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 10 डिसेंबर 2018 ते 10 फेब्रुवारी 2020 या कालावधीत थेरगाव येथे घडला असून याप्रकरणी तब्बल तीन वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परमेश्वर उर्फ प्रमोद नागनाथ सूर्यवंशी (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड (Chinchwad ) आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 6) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला सरकारी कामाचे टेंडर मिळवून देतो आणि त्याद्वारे चांगला परतावा देतो असे आमिष दाखवले. 10 फेब्रुवारी 2018 ते 10 मार्च 2020 या कालावधीत यासाठी आरोपींनी फिर्यादीकडून रोख आणि ऑनलाईन स्वरुपात 23 लाख 10 हजार रुपये घेतले. त्यानंतर भिशीमध्ये चांगला परतावा देतो म्हणून आणखी दोन लाख 40 हजार रुपये घेतले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस कोणताही मोबदला, सरकारी टेंडर मिळवून न देता तसेच घेतलेले पैसे परत न करता महिलेची 25 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.