Pimpri: महापालिकेच्या 25 कर्मचा-यांना आजपर्यंत कोरोनाची लागण

25 PCMC employees tested positive to coronavirus till date.

एमपीसी न्यूज – कोरोना विरोधात लढणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. आजपर्यंत 25 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये कोरोना योद्धे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, उपअभियंता, क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी, कर संकलन विभाग, आरोग्य विभागातील साफसफाई कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. कोरोना विषाणू आल्यापासून महापालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. कोरोनाविरोधातील लढाई लढत आहेत. कोरोनाच्या महामारीत काम करणा-या महापालिका कर्मचा-यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.

कोरोना विरोधात लढणा-या कर्मचा-यांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील कोरोना योद्धा डॉक्टर, नर्सलाही लागण झाली आहे. भोसरी, आकुर्डी रुग्णालयातील वॉर्डबॉय, आया, मावशी यांनाही बाधा झाली आहे.

पालिका मुख्यालयात कार्यरत असलेल्या उपअभियंता, क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी, कर संकलन कार्यालयातील कर्मचारी, आरोग्य विभागातील साफसपाई कर्मचा-यांनाही बाधा झाली आहे. कोरोना विरोधात लढणा-या कर्मचा-यांना लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून पालिकेचे अधिकारी, कर्मचारी काम करत आहे. प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी आहे. सर्वजण आपली जबाबदारी चोखपणे पार पडत आहेत. महापालिकेच्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह उपअभियंता, क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचा-यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कर्मचा-यांनी काम करताना आपल्या जीवाची काळजी घ्यावी. प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.