Pune News : खडकवासला धरणातून रात्री 25 हजार क्यूसेकने विसर्ग

एमपीसी न्यूज : खडकवासला धरण  तुडुंब भरल्याने अवघ्या 7 तासांत धरणातील पाण्याचा विसर्ग 2400 क्युसेकवरून 25036 पर्यंत वाढवत न्यावा लागला. रात्रीतून खडकवासला धरणाचा विसर्ग तब्बल 25 हजार क्यूसेकपर्यंत वाढल्याने पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान रात्री पावसाचा जोर ओसरल्याने सकाळी विसर्ग कमी करण्यात आला आहे. 

विशेष म्हणजे गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात खडकवासला धरण 100 टक्के भरलं होतं यंदा मात्र तेच धरण 22 जुलैला 100 भरलं आहे त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 दिवस आधीच धरणातून पाणी सोडावं लागलंय.

खरंतर खडकवासला साखळी धरणातील चारही धरणं अजून भरलेली नाहीत उर्वरित तीन धरणात अजूनही 60 टक्केच जलसाठा आहे. पण साखळीत सगळ्यात शेवटी असलेल्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसात प्रचंड पाऊस झाल्याने तुलनेनं छोटं म्हणजेच 3 टीएमसीचं धरण यंदा लवकर भरलं आणि काल संध्याकाळी पाच वाजेपासून या धरणातून सर्वप्रथम 2400 क्युसेकचा विसर्ग मुठा नदी पात्रात सोडण्यात आला.

पण तरीही धरणातील पाण्याचा येवा हा विसर्गापेक्षा कितीतरी जास्त असल्याने संध्याकाळी 7 वाजता हाच विसर्ग 5 हजार नंतर रात्री 8 वाजता 10 हजार आणि रात्री 11 वाजता हाच विसर्ग थेट 25 हजार क्यूसेकपर्यंत वाढवावा लागलाय. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहू लागणार आहे. म्हणूनच प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिलाय.

खडकवासला साखळी धरणाची एकूण साठवण क्षमता 29 टीएमसी आहे. ती आत्ताच 17 टीएमसी इतकी झालीय गेल्यावर्षी हाच जलसाठी 9 टीएमसी इतकाच होता यावरून पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर ही चारही धरणं भरून ऑगस्ट महिन्यात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. हे टाळायचं असेल तर जलसंपदा विभागाला आत्तापासूनच पाणी सोडण्याचं फेरनियोजन करावं लागेल. कारण पुणे जिल्ह्यातील धरणातून सोडला जाणारा विसर्ग पुढे उजनी धरणात जाऊन मिसळतो आणि तेही भरलं तर पुढे जाऊन पंढरपूरला पुराचा धोका निर्माण होतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.