Pune News : जम्बो रुग्णालयात 250 बेड तयार, 5 दिवसात 150 नवे रुग्ण दाखल; डिस्चार्जनंतरही सात दिवस घेणार फॉलोअप

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी येथे आढावा बैठक घेऊन बेडची संख्या वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या.

एमपीसी न्यूज – जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देण्याच्या दृष्टीने COEP मैदानावरील जम्बो कोविड सेंटर बेड कार्यान्वित करण्यात येत आहेत. बुधवारी येथे 50 बेड तयार करून कार्यान्वित करण्यात आले. यामुळे जम्बोमध्ये एकूण 250 कोविड बेड कार्यान्वित झाले आहेत. 

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी येथे आढावा बैठक घेऊन बेडची संख्या वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. येथे अधिक संख्येने बेड सुसज्ज करावेत जेणेकरून कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी साह्य होईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो कोविड रुग्णालयाच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी तातडीने बेड वाढविण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली.

आज 45 ऑक्सिजन बेड, तर पाच आयसीयू असे 50 बेड कार्यान्वित केले. तसेच, 30 नवीन रुग्णांना दाखल करून घेण्यात आले. अलीकडे रुग्णांना डिस्चार्ज दिल्यावर उपलब्ध झालेले बेड, तसेच काही कार्यान्वित केलेल्या बेडवर मागील पाच दिवसांत एकूण 150 रुग्णांना प्रवेश देण्यात आले, असे रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

*डिस्चार्जनंतरही सेवा देणार*
जम्बो सेंटरमधील कोरोना रुग्ण बरे होऊन गेल्यानंतर त्यापुढील सात दिवस त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली जाणार आहे. त्या दरम्यान त्यांना पुन्हा लक्षणे आढळून आल्यास आवश्यकतेनुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येतील, अशी माहिती रुबल अग्रवाल यांनी दिली.

जम्बो सेंटर येथे रुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणाली स्थापित करून त्याचा उपयोग करण्यात येत आहे. तसेच प्रभावी व्यवस्थापनासाठी पुणे महापालिका प्रशासनाने पाऊले उचलली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.