Talegaon : कंटेनरमधून 26 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर असलेल्या टोल नाक्याजवळ थांबलेल्या कंटेनरमधून अज्ञात चोरट्यांनी 26 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 24) सकाळी उघडकीस आली.

मोहम्मद सलीम हुक्कदार खान (वय 45, रा. वाशी नाका माहुरी मुंबई) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खान हे कंटेनर चालक आहेत. ते पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून शनिवारी कंटेनर घेऊन जात होते. उर्से टोलनाक्याजवळ त्यांनी कंटेनर थांबवला. कंटाळा आल्याने त्यांनी कंटेनर मध्येच झोप काढण्याचे ठरवले. खान झोपी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कंटेनरचा क्लिनर बाजूचा दरवाजा उघडून 12 हजार 700 रुपयांची रोकड आणि 14 हजार रुपयांचे तीन मोबाईल फोन असा एकूण 26 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला. शनिवारी सकाळी खान झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तळेगाव पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.