HAHK Completes 26 Years: झगमगत्या विवाहसोहळ्याने केली सव्वीस वर्षे पूर्ण

26 years of Hum Aapke Hain Koun Madhuri Dixit shares then-and-now pics with Salman Khan भव्य सेटस, मोठी स्टारकास्ट, झगमगीत कपडे, दागदागिने आणि चक्क भारतीय कौटुंबिक समारंभ यांनी सजलेल्या 'हम आपके है कौन' या चित्रपटाने रसिकांना त्या काळी मंत्रमुग्ध करुन टाकले.

एमपीसी न्यूज – शालीन मोठी सूनबाई, समजूतदार मोठा भाऊ, आदरणीय सासरेबुवा, मिष्किल लहानभाऊ आणि नटखट, देखणी मोठ्या सूनबाईची बहीण, त्यांचा सगळा नातेवाईकांचा गोतावळा आणि एक हाय प्रोफाइल लग्नसोहळा असं म्हटल्यावर चाणाक्ष वाचकांच्या लगेच लक्षात येईल की ही गोष्ट आहे, ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाची. तोच तो चित्रपट ज्याने भारतीय लोकांना भव्य, दिव्य लग्नसोहळ्याची माहिती करुन दिली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काल म्हणजे 5 ऑगस्टला या चित्रपटाने २६ वर्षे पूर्ण केली.

भव्य सेटस, मोठी स्टारकास्ट, झगमगीत कपडे, दागदागिने आणि चक्क भारतीय कौटुंबिक समारंभ यांनी सजलेल्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाने रसिकांना त्या काळी मंत्रमुग्ध करुन टाकले. त्यात अगदी लग्नापासून ते डोहाळेजेवणापर्यंत सगळ्या भारतीय कौटुंबिक समारंभांचा समावेश होता. कधी कधी त्याला लग्नाची कॅसेट असे देखील गमतीने म्हटले जात असे.


या चित्रपटात माधुरी दीक्षितने निशाची भूमिका अगदी झोकात साकारली. ती त्या भूमिकेसाठी चपखल होती. तिचा हिरो होता, तेव्हा थोडासा अबोल, लाजरा वाटणारा सलमान खान.

निशा आणि प्रेम अगदी ‘मेड फॉर इच अदर’ वाटणारे तरुण लव्हबर्डस, त्यांच्या आयुष्यात येणारे ट्विस्ट आणि टर्नस् यातून चित्रपटाची कथा तयार झाली. या दोघांच्या साथीला चित्रपटात रेणुका शहाणे, मोहनीश बहल, आलोकनाथ, रीमा लागू, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, सतीश शहा आणि बिंदू हेही होते. जवळपास साडेतीन तासाच्या लांबीसह या चित्रपटात तब्बल 14 गाणी होती आणि ती सर्व सदाबहार अभिजात ठरली.

हम आपके हैं कौनबद्दलची काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती जी मनोरंजक देखील आहे.

1. 1994 सालच्या सूरज बड़जात्याने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाने भारतीय विवाहसोहळ्याची पद्धत बदलली.
2. बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई करणारा हा पहिला भारतीय चित्रपट होता आणि 90 च्या दशकातला सर्वांत मोठा ब्लॉकबास्टर होता. माधुरी आणि सलमानच्या कारकीर्दीतला हा एक महत्वाचा टप्पा ठरला.
3. त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एचएएचकेने जिंकला.
4. असे म्हटले जाते की या चित्रपटासाठी माधुरीला 2.7 कोटी रुपये मिळाले होते, ही रक्कम सलमान खानच्या मानधनापेक्षा जास्त होती.
5. ‘दीदी तेरा देवर दिवाना’ या गाण्यातील माधुरीची लोकप्रिय जांभळी साडी, मॅचिंग फुल स्लीव्हज, बॅकलेस ब्लाउजसह स्टाईल ट्रेंड बनली.
6. हा चित्रपट राजश्री प्रॉडक्शन्सच्या 1982 साली बनलेल्या ‘नदिया के पार’ या सचिन पिळगावकर आणि साधना सिंह अभिनीत चित्रपटाचा रिमेक होता. मात्र ‘नदिया के पार’ खूपच लो प्रोफाइल म्हणजे साधासुधा होता. कथा साधारणपणे तीच होती. पण ‘हम आपके’ सारखा झगमगाट त्यात अजिबात नव्हता.
७. दिवंगत दिग्गज चित्रकार एम.एफ. हुसेन यांनी असा दावा केला की माधुरीच्या अभिनयाने ते इतके मंत्रमुग्ध झाले होते की त्याने हा चित्रपट 55 वेळा बघितला.

असंही म्हटलं जातं की आमिर खानला या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. पण त्याला याची स्क्रिप्ट आवडली नाही म्हणून त्याने नकार दिला. शेवटी हेच खरं की ‘दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम’. या चित्रपटाने सलमानच्या करियरला मात्र सुसाट वेग आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.