गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

पिंपरीत महापालिकेत भाजप 3 आणि राष्ट्रवादीचे 2 स्वीकृत सदस्य होणार!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत यंदा कमळ फुलले आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्य निवडीत भाजपचा वरचष्मा राहणार आहे. महापालिकेत पाच स्वीकृत सदस्य निवड करता येणार आहेत. भाजपचे 77 आणि राष्ट्रवादीचे 36 नगरेसवक निवडून आले आहेत. त्यामुळे तौलानिक संख्याबळानुसार भाजपचे तीन आणि राष्ट्रवादीच्या दोन जणांना स्वीकृत सदस्यपदी निवडता येणार आहे.

 

महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 77, राष्ट्रवादीचे 36, शिवसेना 9, अपक्ष 5 आणि  मनसे 1 असे बलाबल आहे. महापालिकेत 128 नगरसेवक निवडून येतात, तर पाच स्वीकृत सदस्यांची निवड करता येते. भाजपच्या निवडून आलेल्या 77 नगरसेवकांच्या संख्याबळानुसार भाजपचे 3 पॉईंट होत असून  तीन स्वीकृत सदस्य निवडता येतील. पाचही अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला तरीही भाजप तीनच स्वीकृत सदस्यांची नेमणूक करू शकते.

 

राष्ट्रवादीच्या संख्याबळानुसार 1.40 पॉईंट होत आहेत. शिवसेनेचे 25 आणि अपक्षाचे 19 पॉईंट होत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक निवडून येण्याची शक्यता असून एप्रिलमध्ये निवड होण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, भाजप व राष्ट्रवादीच्या बड्या पदाधिका-यांनी स्वीकृत सदस्यपदी आपली वर्णी लागावी, यासाठी आतापासूनच फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. भाजपकडून ज्येष्ठ नेते महेश कुलकर्णी, प्रदेश सदस्या उमा खापरे, सरचिटणीस बाबू नायर यांची नावे चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाला संधी देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Latest news
Related news