रविवार, फेब्रुवारी 5, 2023

चार्टर्ड अकाउन्टंट इन्स्टीट्युटच्या पुणे शाखेला 3 पारितोषिके

एमपीसी न्यूज – चार्टर्ड अकाउन्टंट संस्थेच्या पुणे शाखेला नुकतेच 2016 मधील उल्लेखनीय कार्याबद्दल चार्टर्ड अकाउंन्टंट संस्था, दिल्लीतर्फे राष्ट्रीय व पश्चिम विभागीय स्तरावर आणखीन दोन पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

 

या संस्थेच्या संपूर्ण भारतात 163 शाखा आहेत. पुणे शाखा ही त्यातील एक शाखा असून राष्ट्रीय स्तरावर तिसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी शाखा आहे. या शाखेअंतर्गत 8000 सी ए व साधारण 22000 हून अधिक विद्यार्थी आहेत.

 

दरवर्षी काही शाखांना त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संस्थेच्या मुख्य कार्यालयाकडून तसेच विभागीय कार्यालयाकडून सर्वोत्तम शाखा हा किताब दिला जातो. यावर्षीचा राष्ट्रीय पातळीवरील किताब मिळवणार्‍या 10 शाखांमध्ये पुणे शाखेने मुख्य कार्यालयाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे काम करून जवळजवळ 99 टक्के गुण संपादन केले व “राष्ट्र स्तरावरील सर्वोत्तम शाखेचे दुसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक” संपादन केले. हा पारितोषिक वितरण सोहळा दिल्ली येथे पार पडला. याचबरोबर पुणे शाखेने विभागीय स्तरावर 100 टक्के गुण संपादन करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. तसेच पुणे शाखेच्या विद्यार्थी संघटनेने विभागीय स्तरावरील दुसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. हा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच दमण येथे पार पडला.

 

याविषयी पुणे शाखेच्या अध्यक्षा  रेखा धामणकर म्हणाल्या की, या अभूतपूर्व यशामध्ये शाखेने सीए व सीए विद्यार्थी यांच्यासाठी राबविलेले विविध उपक्रम, तांत्रिक प्रशिक्षण वर्ग, अनेक वैविध्यपूर्ण राष्ट्रीय / राज्यस्तरीय / पश्चिम विभागीय/ आंतरराष्ट्रीय परिषदा, विविध कार्यशाळा, आर्थिक क्षेत्रातील तसेच सामाजिक विषयावरील नवनवीन घडामोडींबाबत जनजागृती करणारे कार्यक्रम, महिला सबलीकरणाचे कार्यक्रम, तसेच अनेक इतर संस्थांबरोबर/ शाखांबरोबर संयुक्त कार्यक्रम, ई. चा प्रामुख्याने समावेश होतो. सर्वांच्या सहकार्याने, मान्यवरांच्या व ज्येष्ठांच्या आशीर्वादाने व अनेक हितचिंतकांच्या शुभेच्छांमुळे हे यश संपादन करणे शाखेला शक्य झाले.

Latest news
Related news