Pimpri: पिंपळेगुरव येथील आठ महिन्याच्या बाळासह तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळेगुरव भागातील एका आठ महिन्याच्या बाळाचे आणि सांगवीतील दोन अशा तिघांचे शुक्रवारी (दि.1) रात्री उशिरा कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोरोनाच्या सक्रिय 68 रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, शहरातील आणि महापालिका हद्दीबाहेरील अशा 123 जणांना आजर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. 42 जण कोरोनामुक्त झाले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेने शहरातील कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट शुक्रवारी (दि.1) रात्री उशिरा आले आहेत. त्यामध्ये पिंपळेगुरव परिसरातील एका आठ महिन्याच्या बाळाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. तर, सांगवीतील 20 आणि 45 वर्ष असलेल्या दोन पुरुषांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तिघांना कोरोनाची लागण कोणाच्या संपर्कातून झाली हे समजू शकले नाही. ते कोणाच्या संपर्कात आले होते, याची माहिती काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. तर, आजपर्यंत शहरातील 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 14 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मागील 23 दिवसांत 98 नवीन रुग्णांची भर!

शहरात 8 एप्रिल पासून दररोज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण येत आहेत. 8 एप्रिलला एक, 9 ला तीन, 10 एप्रिल रोजी चार, 11 एप्रिलला दोन , 12 एप्रिलला पाच, 13 एप्रिल रोजी दोन, 14 एप्रिल  रोजी एकाच दिवशी सहा, 15 एप्रिल रोजी चार, 16 एप्रिल रोजी चार, 17 एप्रिल रोजी दोन, 18 एप्रिल रोजी सात, 19, 20, 21  एप्रिल रोजी प्रत्येकी एकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.  22 एप्रिल रोजी तीन, 23 एप्रिल रोजी तीन रुग्ण,   24 एप्रिल रोजी  एकाच दिवशी 11 रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. 25 एप्रिल रोजी दोन, 26 एप्रिल रोजी एक,  27 एप्रिल रोजी 11 आणि 28 एप्रिल रोजी 11, 29 एप्रिल रोजी आठ, 30 एप्रिल रोजी पाच आणि शुक्रवारी (दि.1 मे) रोजीही तिघांचे  रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.  त्यामुळे मागील 23 दिवसांत 98 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील पण शहरात उपचार सुरू आहेत अशा 123  जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 42 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 67 रुग्णांवर आणि शहरातील 10 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याशिवाय पुणे जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  तर, रविवारी (दि.12) थेरगाव भागातील एका पुरुषाचा, सोमवारी (दि.20) निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि शुक्रवारी (दि. 24)  निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, बुधवारी (दि.29) खडकीतील एका महिलेचा वायसीएम रुग्णालयात अशा पाच जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.