Wakad : वाकडमध्ये पोलिसाला मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – वाकड परिसरात एका पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना आज, सोमवारी (दि. 27) घडली असून याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युनूस गुलाब आत्तार (वय 50), मतीन युनूस आत्तार (वय 28), मोईन युनूस आत्तार (वय 24, तिघे रा. भारत माता चौक, काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची मावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई शंकर विश्वभर कळकुटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिंपरी चिंचवड महापालिका अतिक्रमण विभागात कार्यरत आहेत. ते सोमवारी काळेवाडी परिसरात काम करीत होते. त्यावेळी आरोपी युनूस रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळले. त्यामुळे कळकुटे यांनी त्याला हटकले. यावरून आरोपीने कळकुटे यांच्याशी हुज्जत घातली.

आरोपी मतीन याने काठीने तर अन्य दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. कळकुटे यांच्या हातातील काठी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारहाण, आपत्ती व्यवस्थापन कायदा, कोविड 19 उपाययोजना 2020, साथीचे रोग अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

समाजाला कोरोनाच्या संकटापासून वाचविण्यासाठी, नागरिकांचा एकमेकांशी कमी अंतरावरून संपर्क होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा अहोरात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटताना तीन पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे.

तरीही पोलीस आपल्या कर्तव्यात कसलाही कसूर ठेवत नाहीत. अशा परिस्थितीत पोलिसांवर हल्ला होणे ही दुर्दैवी बाब आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होईल, असे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.