Pune : पुण्यात 3100 कोटींचे रस्ते; पालिकेचा आराखडा तयार

'मिसिंग लिंक'सह विविध कामांचा डीपी तयार

एमपीसी न्यूज : शहराच्या विकास आराखड्यातील (डीपी) 273 किलोमीटर लांबीच्या 390 रस्त्यांसह कात्रज-कोंढवा रस्ता, खराडी-शिवणे रस्ता, बालभारती-पौड फाटा रस्ता, जुना-पुणे मुंबई रस्त्याची कामे करण्यासाठी महापालिका प्रशासनाने 3100 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. (Pune) या वर्षात या रस्त्यांच्या कामांसाठी 250 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यापैकी 1800 कोटी रुपये विकास आराखड्यातील 273 किलोमीटरच्या मिसिंग लिंकजोडण्यासाठी आवश्यक आहेत.

महापालिकेच्या पथ विभागाने शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून ‘मिसिंग लिंक’ शोधल्या आहेत. त्यामध्ये महापालिकेची जुनी हद्द, नव्याने समाविष्ट झालेली 34 गावे (प्रादेशिक आराखडा), महापालिकेत समाविष्ट झालेल्या जुन्या 23 गावांशिवाय हिंजवडी, खडकवासला आणि वाघोली या गावांचेही सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी 273 किलोमीटर रस्ते तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. या रस्त्यांसाठी भूसंपादनासह रस्ते निर्मितीसाठी 1800 कोटी रुपयांची गरज लागणार आहे. प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात सल्लागाराची नियुक्ती करणे; तसेच प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रत्येकी पाच किलोमीटरचा एक असे पाच पॅकेजचे काम पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे.

IPL 2023 : पंजाब किंग्स ची पहिली आयपीएल ट्रॉफी अजून किती लांब?

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामात भूसंपादनाचा मोठा अडथळा आहे. महापालिकेने या रस्त्यासाठी 200 कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. (Pune) महापालिकेने आतापर्यंत 48 कोटी रुपये या रस्त्यांवर खर्च केले असून, 28 टक्के काम झाले आहे. भूसंपादनाव्यतिरिक्त या रस्त्यासाठी 192 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी 40 कोटी रुपयांची तरतूद आगामी वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शिवणे-खराडी रस्त्यासाठी आतापर्यंत 280 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

‘मिसिंग लिंक’ 

महापालिकेने विकास आराखड्यात प्रस्तावित केलेले रस्ते एकमेकांना जोडणारे आहेत. या रस्त्यांअभावी शहराच्या सर्वच भागांत कोंडी होत आहे. सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता, आळंदी रस्ता, जुना पुणे-मुंबई रस्ता, औंध रस्ता, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, पौड रस्ता, कर्वे रस्ता आणि सिंहगड रस्ता या सर्व रस्त्यांना जोडणारा वर्तुळाकार रस्ता सध्या अस्तित्वात नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ‘एचसीएमटीआर’ आणि ‘पीएमआरडीए’कडून वर्तुळाकार मार्ग विकसित करण्यात येत आहेत. त्याबाहेरून ‘एमएसआरडीसी’चा वर्तुळाकार मार्ग प्रस्तावित आहे. या दोन्ही मार्गांसाठी बराच वेळ लागेल. महापालिकेने विकास आराखड्यात या मार्गांना जोडणारे अनेक रस्ते प्रस्तावित केले आहेत. त्यातील काही रस्ते तयार झाले असले, तरी वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल

यंदाच्या अर्थसंकल्पात लहान-मोठ्या अशा 240 रस्त्यांसाठी 290 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यातून सुमारे 153 रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. उर्वरित 70 रस्त्यांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या आर्थिक वर्षात 155 कोटी रुपयांची रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत.(Pune) आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात नवीन व जुन्या रस्त्याच्या कामांसाठी 675 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.