‘रफ अॅण्ड टफ’ नोकिया 3110 परत येतोय….

एमपीसी न्यूज – भारतीय बाजारपेठेत सर्वात मोठे नाव असलेले नोकिया फोन स्मार्टफोन्सच्या युगात काहीसे मागे पडल्याचे चित्र मध्यंतरीच्या काळात पहायला मिळाले. ‘रफ अॅण्ड टफ’ आणि लाँगलाईफ बॅटरी ही नोकिया फोन्सची खासियत. आजही कॉलिंगसाठी नोकियाचे जुने हॅण्डसेट काही लोकांकडे पाहायला मिळतील, तर असा हा ‘रफ अॅण्ड टफ’ नोकिया 3110 परत येणार असल्याची माहिती गॅझेट्स संदर्भातील अपडेट्स देणा-या पत्रकार इवान ब्लास यांनी दिली आहे. तसेच या महिन्यात कंपनीकडून या संदर्भातली अधिकृत घोषणा होईल, असेही सांगितले.
नोकिया 3310 मध्ये कॅमेरा नसला तरी लाँगलाईफ बॅटरी आणि टिकाऊपणा या वैशिष्ट्यांमुळे कित्येक मोबाईल युजर्सच्या पसंतीस उतरला होता. अजूनही स्मार्टफोन हातात असला तरी ज्यांच्याकडे हा जूना मोबाईल आहे, त्यांना तो विकण्याचीही इच्छा होत नाही. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत त्यांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी हे फोन बाजारात आणणार असल्याची चर्चा आहे. स्मार्ट फोनची बॅटरी लाईफ ही कमी असते. त्यामुळे पर्याय म्हणून अशा मोबाईल धारकांना हे 3310 हॅण्डसेट वापरता येणार आहे. या हॅण्डसेटची किंमत 4 हजारांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे.
तर दुसरीकडे येत्या 27 तारखेला नोकिया आपला स्मार्टफोन देखील लाँच करणार आहे. बार्सिलोना येथे होणाऱ्या वर्ल्ड मोबाइल काँग्रेसमध्ये नोकिया स्मार्टफोन लाँच करणार आहे. नोकियाचा पी 1 हा स्मार्टफोन असणार आहे. स्मार्टफोनच्या बाजारात नोकिया पुन्हा एकदा आपले वर्चस्व घडवण्यासाठी धडपडत आहे. काही दिवसांपूर्वी नोकियाने चीनमध्ये नोकिया 6 लाँच केला होता. बाजारात उपलब्ध झाल्यापासून या फोनची तुफान विक्री झाली. विक्री सुरू होण्याच्या आधीच दहा लाख लोकांनी या फोनची नोंदणी केली होती.