Mumbai: ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत 326 भारतीय लंडनहून मायदेशी दाखल

326 Indians repatriated from London under 'Vande Bharat Mission'

एमपीसी न्यूज – भारत सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’ या सर्वात मोठ्या रेस्कू ऑपरेशन अंतर्गत कोरोना लॉकडाऊनमुळे इंग्लंडमध्ये अडकलेल्या 326 प्रवाशांना घेऊन लंडन येथून निघालेले एअर इंडियाचे एआय 130 हे विमान आज पहाटे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरूप उतरले. 

कोरोना लॉकडाऊनमुळे जगभरात विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘वंदे भारत मिशन’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत सात ते 13 मे या काळात 15 हजार भारतीयांना परदेशांतून भारतात आणण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. काही विमाने आणि भारतीय नौदलाच्या युद्धनौकांचा त्यासाठी वापर करण्यात येत आहे. विमानाने येणाऱ्या प्रवाशांना भाड्याची रक्कम मोजावी लागणार आहे, मात्र युद्धनौकांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या खर्चाची जबाबदारी सरकारने उचलली आहे.

_MPC_DIR_MPU_II

अमेरिकेतील भारतीय परतण्यास आजपासून सुरूवात

‘वंदे भारत मिशन’ या नावाने परदेशातील भारतीयांना मायदेशी आणण्याची आजवरची सर्वांत मोठी मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत आज (रविवारी) सात विमानांतून भारतीयांना अमेरिकेतून मायदेशी आणले जाईल. ‘विमानांतील आसनसंख्या मर्यादित असल्यामुळे वैद्यकीय अडचण असलेले, कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूमुळे परतावे लागत असलेले, विद्यार्थी, गर्भवती महिला, व्हिसाची मुदत संपत आलेले ज्येष्ठ नागरिक अशांना परतपाठवणीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी संगणकीय सोडत पद्धतीने प्रवाशांची निवड केले जाईल,’ असे दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पहिली टप्प्यात सात विमाने आज (रविवारी) सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबई आणि हैदराबादला पोहचतील. दुसऱ्या टप्प्यात 13 मे रोजी सात विमाने नवी दिल्ली आणि बेंगळुरूसाठी उड्डाणे करतील. या विमानांसाठी इकॉनॉमी क्लासचे तिकीट एक लाख रुपयांहून अधिक, बिझनेस क्लासचे दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आणि फर्स्ट क्लासचे चार लाख रुपयांपेक्षा अधिक असेल. त्यातही बदल होऊ शकतो, असा सूचनावजा इशारा दूतावासाने दिला आहे. देशांतर्गत प्रवासासाठी अतिरिक्त तिकीट दर आकारला जाऊ शकतो.

एअर इंडिया 10 मे रोजी न्यूयॉर्कहून मुंबई आणि अहमदाबाद, 14 मे रोजी नवी दिल्ली आणि हैदराबाद, 11 मे रोजी शिकागोहून मुंबई आणि चेन्नई आणि 15 मे रोजी नवी दिल्ली आणि हैदराबादला विमाने सोडणार आहे. वॉशिंग्टन डीसीहून 12 मे रोजी एक विमान दिल्ली आणि हैदराबादसाठी उड्डाण करेल. सर्व प्रवाशांची विमानतळावर वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे; तसेच भारतात परतल्यानंतर सर्वांना सक्तीने 14 दिवस विलग होऊन राहावे लागणार आहे, असेही दूतावासाने कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1