Talegaon : मच्छी मार्केटमधील 35 किलोचा खवल्या मासा ठरला खवय्यांचं आकर्षण

एमपीसी न्यूज – वराळे हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात गुरुवार (दि.७) सायंकाळी ५ वा. ३५ किलोचा खवल्या जातीचा मासा पकडण्यात आला. हा मासा तळेगाव दाभाडे मच्छी मार्केटमध्ये मासे खवय्यांचे खास आकर्षण ठरला आहे. 

सुनील हिलम (वय २९) यांनी वराळे हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात जाळ्याने पकडला. हा मासा एकट्याला पकडता येत नसल्याने नामदेव वाघमारे, बाळू मुकणे, आत्माराम मुकणे या तिघांनी पुढाकार घेतल्याने मासा पकडण्यात यश आले. तळेगाव दाभाडे मच्छी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणला असता, अनेकांनी माश्यासोबत सेल्फी काढला. मोठा मासा असल्याने खरेदीसाठी झुंबड उडाली होती. हा मासा ४०० रुपये प्रति किलोने विकण्यात आला.

सुनील हिलम म्हणाले या नदीपात्रात ४० किलोचा खवल्या मासा गेल्या वर्षी पकडला होता. असे मासे कधीतरी सापडतात. मासेमारीवरच आमचा उदरनिर्वाह आहे. गेल्या अनेक पिढ्यानपिढ्या पासून मासेमारी करत असून जिवंत व ताजे मासे असल्याने मागणी जास्त आहे. शासनातर्फे मासेमारीसाठी जाळी तसेच सुसज्ज मच्छी मार्केट तळेगाव दाभाडे शहरात उभारण्याची मागणी मच्छीमार नागरिकांनी याप्रसंगी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.