Pune News : स्थायी समितीत 35 प्रस्ताव ‘दाखल मान्य’; अन् पत्रकार परिषद अचानक रद्द !
एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर नगरसेवकांनी दिलेल्या प्रस्तावासह किरकोळ निविदांचे प्रस्ताव ठेवले जातात. मात्र, कोट्यवधी रुपयांच्या निविदांचे विषय स्थायीच्या बैठकीत ऐनवेळी दाखल मान्यतेसाठी आणले जात आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत आज दाखल मान्यतेसाठीचे सुमारे 35 हून अधिक प्रस्ताव ‘दाखल मान्य’ झाले. दरम्यान, पत्रकारांच्या संभाव्य प्रश्नांची कुणकुण लागल्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची नियमित पत्रकार परिषद अचानक रद्द करण्यात आली.
स्थायी समितीच्या प्रत्येक प्रस्तावावर गटनेत्यांशी चर्चा केली जाते. परंतु, याला फाटा देत शहराच्या दृष्टीने महत्वाचे आणि धोरणात्मक विषय, कोट्यवधी रुपयांच्या निविदांचे विषय स्थायीच्या बैठकीत ऐनवेळी दाखल मान्यतेसाठी आणले जात आहेत. त्यामुळे स्थायी समिती ही केवळ ‘दाखल मान्य समिती’ बनली आहे की काय, अशी चर्चा पालिकेत रंगली होती.
महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीमध्ये शहर व जनतेच्या हिताचे धोरणात्मक आणि आर्थिक बाबी विषयी निर्णय घेतले जातात. स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर विषय आल्यानंतर त्या प्रस्तावाची सविस्तर माहिती घेतली जाते. त्या विषयावर गटनेत्यांमध्ये चर्चा होते. सार्वजनिक लोकहिताची, शहराच्या दृष्टीने महत्वाच्या विषयाची बातमी होते. त्यातून या प्रस्तावावर साधक बाधक चर्चा होते.
त्यानंतर स्थायी समितीमध्ये त्यावर अंतिम निर्णय घेतला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर नगरसेवकांनी दिलेले प्रस्ताव आणि किरकोळ निविदांचे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवले जात आहेत.
नगरसेवक व नगरसेविकांच्या ‘मर्जीतल्या अन् सदैव सहकार्य’ करणाऱ्या ठेकेदारांचे विषय मंजूर करण्यात आले. दाखल मान्यतेसाठी विषय आणून तो मंजूर करायचा. तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्यावर चर्चा होउनही उपयोग नसतो. कारण स्थायी समितीमध्ये मंजूर केलेल्या अनेक दाखल मान्य विषयाची माहिती दिलीच जात नाही.
आंबिल ओढ्यावरील गुजरवाडी ते मित्र मंडळ चौक अंर्तगत येणाऱ्या नाल्यावरील कर्ल्व्हट बांधणे, दुरुस्ती करणे तसेच सिहंगड रस्ता, हिंगणे अंर्तगत येणाऱ्या नाल्यावरील कर्ल्व्हट बांधणे, दुरुस्तीकरणे या दोन्ही कामांचे 43 कोटीच्या खर्चाचे दायित्व स्विकारण्याचा विषय ऐनवेळी दाखल मान्यतेसाठी आणण्यात आला. पण स्थायीमध्ये ‘अर्थपूर्ण’ साधकबाधक चर्चा न झाल्यामुळे तो मंजूर झाला नाही.
शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत होते. त्यावेळी पालिकेने विलनीकरण कक्ष तयार केले. या कक्षांसाठी पालिकेने 67/3 खाली विना निविदा कामे करून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. या सर्व विषयांना स्थायी समितीला मान्यता द्यावीच लागणार आहे. त्यामुळे हे विषय देखील ऐनवेळी दाखल केले जात आहेत.
त्यामुळे स्थायी समिती केवळ ‘दाखल मान्य समिती’ बनल्याचे आज निदर्शनास आले. या संदर्भात काही चाणाक्ष पत्रकारांकडून प्रश्न उपस्थित केले जाणार होते, पण अचानक शेवटच्या क्षणी पत्रकार परिषदच रद्द करण्यात आली.