लोणावळा शहराचा पारा पोहचला 37 अंशावर, गरमीने नागरिक हैराण

एमपीसी न्यूज – घाटमाथ्यावरील जगप्रसिध्द थंड हवेचे पर्यटनस्थळ असा नावलौकिक असलेल्या लोणावळा शहराचा पारा मागील काही दिवसांपासून 37 अंशावर पोहचल्याने खरंच या शहराला थंड हवेचे ठिकाण म्हणायचे का असे विचारण्याची पाळी नागरिक व पर्यटकांवर आली आहे. मागील आठवडाभरापासून शहरात प्रचंड उष्मा वाढला असून या गरमीने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत रस्त्यावरुन चालणे व वाहने चालविणे असाह्य होऊ लागल्याने नागरिक दुपारी १२ ते ४ या वेळेत घरातून बाहेर न पडणे पसंत करु लागले आहे.
 
      
थंड हवेचे ठिकाण म्हणून खरं तर लोणावळा शहरात जगभरात ओळख आहे. राज्याच्या विविध भागातून तसेच परराज्यातून पर्यटक लोणावळ्यात खास थंड हवेचा आस्वाद घेण्यासाठी येथे येत असतात. मात्र शहराच्या वातावरणात झालेला बदल हा येथील पर्यटन व्यावसायाला मारक ठरु लागला आहे. लोणावळा शहराची थंड हवा ही ओळखच शहरासाठी मारक ठरु लागली आहे. घाटमाथ्यावरील या पर्यटनस्थळी आपले स्वतःचे एकतरी घर असावे या धनिकांच्या लालचेपोटी शहराच्या निर्सगाची मोठी हानी झाली असून मागील दोन दशकांपासून शहरात मोठ्या प्रमाणात झालेल्या नागरिकरणाने शहराच्या वातावरणात मात्र बदलाव निर्माण झाला आहे. 

लोणावळा नगरपरिषदेसह कोणाचेही या नागरिकरणांवर नियंत्रण नसल्याने दरदिवशी या नागरिकरणात वाढ होत आहे. हिरव्यागार झाडांनी बहरलेले डोंगर व परिसर नजरेसमोर गायब होत असून त्या जागेवर टोलेजंग सिमेंटच्या इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. वाहनांची प्रचंड वाढलेली संख्या या पर्यावरण संतुलन बिघडात महत्वाची भुमिका बजावत आहे. 
 
      
दहा वर्षापुर्वी लोणावळा शहराचे वातावरण वर्णन करावे असे थंड असायचे. एप्रिल मे महिन्याच्या अखेरीस शहराचा पारा कोठेतरी 28 ते 30 अंशापर्यत अपवादात्मक जायचा आज फेब्रुवारी महिन्यात हा पारा 37 अंशावर पोहचला आहे. ज्या महिन्यांना आपण गरमीचे महिने म्हणतो ते मार्च, एप्रिल व मे महिना अद्याप उजाडायचा आहे. आजच गरमीला सुरुवात होता शहरातील तापमानाची ही अवस्था असेल तर पुढे तिन महिन्यात काय होणार असा प्रश्न नागरिकांना पडतो आहे. दिवसा व रात्री देखील या थंड हवेच्या माहेरघरात पंखे लावल्याशिवाय बसता येत नाही ही स्थिती निर्माण झाली आहे. झालेले नागरीकरण तर कमी करणे शक्य होणार नसले तरी भविष्यकाळात याला काही प्रमाणात आळा नक्कीच घालता येणे शक्य असल्याने त्यादृष्टीने पाऊले उचलणे ही काळाची गरज आहे. त्याच सोबत शहरात व आजुबाजुच्या परिसरात ज्या मोकळ्या जागा उपलब्ध आहेत. डोंगर आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करुन ती झाडे जगविण्यासाठी सर्वोत्तोपरी पर्यत होणे गरजेचे आहे अन्यथा लोणावळ्याची थंड हवा ही ओळख इतिहासजमा होण्यास फारसा कालावधी लागणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.