Pune : मुंबई, नवी मुंबईमध्ये आणखी चौघांना कोरोनाची बाधा; राज्यातील बाधितांचा आकडा 37

एमपीसी न्यूज – मुंबई येथे दोन आणि नवी मुंबई येथे दोन जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील  कोरोना बाधितांचा आकडा 37 वर पोहोचला आहे. प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भात कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी एकाचा तपासणी अहवाल सकारात्मक आला. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या नऊवर पोहोचली. तर पुणे जिल्ह्याचा आकडा १५ झाला आहे. त्यानंतर सोमवारी (दि. 16) मुंबई येथे दोन तर नवी मुंबई येथे दोन जणांचा तपासणी अहवाल सकारात्मक आला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा 37 वर पोहोचला आहे.

कोरोनाची लागण झालेल्या आणि संशयित नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, राज्य शासनाने शाळा, महाविद्यालये, मॉल, जलतरण तलाव 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना देखील परवानग्या देण्याचे बंद केले असून यापूर्वी दिलेल्या परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे जिल्ह्यात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वैद्यकीय विभाग आणि इतर सर्व प्रशासन कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. दररोज खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच कोरोनाची लक्षणे आढळताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे देखील सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.