Pimpri : ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या 40 बालमावळ्यांनी 10 महिन्यात सर केले तब्बल 29 किल्ले

दुर्गजागर मोहिमेत सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज – ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या वतीने ‘दुर्गजागर मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सातवी ते नववीच्या 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या बालमावळ्यांनी दहा महिन्यात पुणे जिल्ह्यातील तब्बल 29 किल्ले सर करून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान. महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास आपण लहानपणापासून ऐकतो, चौथी व सातवीच्या वर्गात पाठ्यपुस्तकातून अभ्यासतो. महाराजांची रणनीती, राजनीती,  पराक्रम, स्वराज्य स्थापनेपासून ते स्वराज्य वैभवाप्रत नेणारे महाराजांचे नरवीर या सर्वांचा अभ्यास प्रत्यक्ष त्या-त्या ठिकाणी जाऊन करता यावा, या हेतूने ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयातील इतिहास अध्यापक शिवराज पिंपुडे यांनी एक मोहीम आखली. मोहिमेचे नाव होते ‘दुर्गजागर’. संकल्प होता 10 महिन्यात पुणे जिल्ह्यातील 29 किल्ले सर करण्याचा.

ट्रेकिंग करणे हा या मोहिमेचा मर्यादित हेतू नव्हता. तर मुलांचा इतिहासाचा अभ्यास व्हावा, त्यांच्या क्षमतांचा कस लागावा, त्यांना गटात काम करण्याची संधी मिळावी, गटकार्याचे शिक्षण व्हावे, अनेक तज्ज्ञ व्यक्तींचा सहवास लाभावा, मुले निसर्गाच्या जवळ जावीत, त्यांनी साहस अनुभवावे अशा हेतूने या मोहिमेची आखणी करण्यात आली. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला. सातवी ते नववीतील सुमारे 72 जणांनी मोहिमेसाठी नोंदणी केली. त्यापैकी 40 विद्यार्थ्यांनी सर्व किल्ले सर केले.

मोहिमेचे दोन टप्पे करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात सोप्या श्रेणीतील किल्ले निवडण्यात आले. पण यंदा उन्हाळा जरा अधिकच कडक असल्याने हे किल्ले सुद्धा थोडे अवघडच वाटले. एप्रिल 2019 मध्ये मोहिमेस सुरुवात झाली. जानेवारी 2020 मध्ये मोहिमेची सांगता झाली. 40 विद्यार्थ्यांपैकी 14 मुली तर 26 मुले होती. 29 पैकी 24 ट्रेक हे रविवारी किंवा अन्य शालेय सुट्ट्यांच्या दिवशी झाले. मोहीम सुरू असताना मुलांना विविध विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले. वर्षभरात अशी एकूण बारा सत्रे झाली. यामध्ये किल्ल्याचे विविध घटक कोणते, जैवविविधतेचा परिचय, पुणे जिल्ह्यातील किल्ले, ट्रेकिंगच्या साहित्याचा परिचय, प्रवास वर्णन कसे करावे, महाराजांवरील प्रेरणादायी पद्य पाठांतर, गटात काम कसे करावे, गटप्रमुख म्हणून काम कसे करावे, उत्तम फोटो काढण्याची तंत्रे अशा विविध विषयांचा समावेश होता. अगदी चुलीवर मसालेभात कसा करावा हे देखील मुलांना शिकवण्यात आले.

यासर्व प्रशिक्षणाचे उपयोजनही करून घेण्यात आले. सिंहगडावर छायाचित्रणाची स्पर्धा घेण्यात आली. प्रवासवर्णन लेखनाची स्पर्धा घेण्यात आली. किल्ल्याच्या विविध घटकांचे वर्णन लिहिण्यासाठी प्रत्येक मुलाला एक हस्तपुस्तिका तयार करून देण्यात आली. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा अशा तिन्ही ऋतूत मोहीम सुरूच राहिली. आठवडाभर शाळा करून रविवारी मुले ट्रेक करायची व सोमवारी नेहमीप्रमाणे शाळेत जायची. हळूहळू मुलांमधील तग धरण्याची क्षमता वाढत गेली. राजमाचीचा सुमारे 16 किलोमीटरचा ट्रेक मुलांनी एक दिवसात पूर्ण केला. तर राजगड ते तोरणा हा 30 किमीचा जोड ट्रेक मुलांनी दोन दिवसात पूर्ण केला. काही ट्रेकचे नेतृत्व मुद्दाम मुलांकडे सोपवण्यात आले. मुलांनीही वेगवेगळ्या कल्पना वापरून त्यांच्यावरचा विश्वास सार्थ ठरवला.

पालकांनाही ट्रेकमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. 29 ट्रेकमध्ये मिळून एकूण 81 पालक सहभागी झाले. याशिवाय सहा पालकांनी मोहिमेसाठी भरपूर सहकार्य केले. या सहा पालकांना सर्वजण गमतीने ‘सेनापती’ म्हणू लागले. सतीश पवार, सचिन शिंदे, सोमशंकर डाके, अरुण मरळ, शितल शिंदे, राम तरस हे या मोहिमेचे सहा सेनापती होते. शितल शिंदे आणि सोमशंकर डाके यांनी मुलांसोबत सर्व किल्ल्यांची मोहीम पूर्ण केली. मोहिमेच्या सांगता समारंभासाठी दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर व एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर आवर्जून उपस्थित होते. दोघांनीही मुलांचे व पालकांचे भरपूर कौतुक केले. अशा प्रकारच्या मोहिमा शाळाशाळातून झाल्या पाहिजेत, असे मत तापकीर यांनी व्यक्त केले. मोहीम फत्ते केलेल्या सर्व शाळकरी मावळ्यांचे मावळी पगडी, ऐतिहासिक प्रसंग असलेल्या प्रतिकृती व स्मृतिचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले. मोहिमेसाठी चिंचवडच्या गड-किल्ले सेवा समितीचे विशेष सहकार्य लाभले. या समितीचे दोन कार्यकर्ते निलेश गावडे आणि रघुराज एरंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.