Pimpri : पिंपरी चिंचवड शहरातील पाच घाटांवर 43 हजार मूर्तीदान

संस्कार प्रतिष्ठानचा उपक्रम

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील विविध घाटांवर गणेश भक्तांना मूर्तीदान करण्यासाठी प्रेरित करून त्याद्वारे 43 हजार 123 मूर्त्यांचे दान जमा केले. हा उपक्रम संस्कार प्रतिष्ठान, टाटा व्होलेंटीअरिंग टाटा मोटर्स पुणे आणि डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल सायन्स अँड रिसर्च पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पाच विसर्जन घाटांवर राबविण्यात आला. तसेच या उपक्रमांतर्गत तब्बल 35 टन निर्माल्य जमा करण्यात आले.

संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने सुरू करण्यात आलेला उपक्रम यंदा बविसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील पाच घाटांवर मूर्तीदान उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमाला गणेश भक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सकाळी आठ पासून रात्री बारा वाजेपर्यंत तब्बल 43 हजार 123 मूर्ती प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांकडून जमा करण्यात आल्या.

पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी, थेरगाव पूल, बिर्ला घाट, मोरया गोसावी मंदिर घाट, केशवनगर या घाटांवर हा उपक्रम राबविला. अनिल कदम यांनी पुण्यातून 500 गणेश मूर्ती आणि 17 टन निर्माल्य जमा करून या उपक्रमात सहभाग घेतला. यावर्षी प्रथमच दान घेतलेल्या सर्व मूर्तींचे विसर्जन कन्व्हेअर वरून करण्यात आले, त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. वाकड येथील घाटावर 3 हजार 500, केशवनगर 1 हजार 200, मोरया गोसावी घाटावर 1 हजार 800 मूर्तींचे दान मिळाले.

गणपती दान घेण्यासाठी प्रतिष्ठानचे 150 सदस्य, टाटा व्होलेंटीअरिंग टाटा मोटर्स पुणे यांचे 200 कामगार आणि डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल सायन्स अँड रिसर्च पिंपरीच्या 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच निर्माल्य जमा करण्यासाठी संस्कार संस्कृती सदभावना महिला बचत गटाच्या 36 महिलांनी सहकार्य केले. दान घेतलेल्या सर्व मूर्तींचे विनोदे वस्ती येथील तळ्यात विधिवत विसर्जन करण्यात आले. तर दान घेतलेल्या निर्माल्याचे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गांडूळखत प्रकल्पाला देण्यात आले.

संस्कार प्रतिष्ठानच्या 145 सदस्यांनी चिंचवड पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष पोलीस अधिकारी म्हणून पोलीस बंदोबस्तासाठी मदत केली. बंदोबस्तादरम्यान संगीता जायभाय यांचा लहान मुलगा हरवला होता, तो स्वयंसेवकांनी तात्काळ शोधून दिला. तसेच विलास मांढरे यांची मुलगी योगिता मांढरे या मुलीला देखील विशेष पोलीस अधिकारी झालेल्या स्वयंसेवकांनी तात्काळ शोधून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.