गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

पुण्यात 5 मार्चला एफएसएआय लाईफ अर्धमॅराथॉन स्पर्धा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका, फायर ब्रिगेड डिपार्टमेंट आणि फायर अॅण्ड सेक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जीवरक्षा आणि सुरक्षितता याकरिता जनजागृती करण्यासाठी एफएसएआय लाईफ अर्धमॅराथॉन स्पर्धेचे शहरात 5 मार्चला आयोजित करण्यात आले आहे.

21 किमी अंतराची एफएसएआय लाईफ अर्धमॅराथॉन स्पर्धेसाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथून सुरू होणार असून बाणेर व विद्यापीठ मार्गे औंधपर्यत आणि परत बालेवाडी स्टेडियम असा मार्ग असणार आहे. पत्रकारपरिषदेत एफएसएआयचे सदस्य त्रिलोकीनाथ तिवारी, सेक्युरिटी शेल्स्‌चे संचालक व मॅराथॉन शर्यतीचे कार्यकारी अध्यक्ष महेश गव्हाणे, एफएसएआयच्या पुणे विभागाचे सचिव विरेंद्र बोराडे, अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे आणि एफएसएआयच्या पुणे विभागाचे अध्यक्ष आनंद जोशी, एफएसएआयचे सदस्य समीर चित्रे, भारती विद्यापीठाचे प्रिंसिपल डॉ. सचिन शेंडोकर, मंदार सावंत आदी उपस्थित होते.
 

ही स्पर्धा पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे आणि एफएसएआयच्या पुणे विभागाचे अध्यक्ष आनंद जोशी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली आहे. ही स्पर्धा पुणेकरांसाठी महत्वाचा उपक्रम ठरावी, असा निर्धार रणपिसे यांनी केला असून रणदीप हुडा यांची एफएसएआय लाईफ अर्धमॅराथॉन स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

एफएसएआयचे सदस्य समीर चित्रे हे स्वतः एक हौशी मॅराथॉन धावपटू असून त्यांनी नुकताच दक्षिण अफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे 89 मैल अंतराच्या शर्यतीत भाग घेतला. तेथील वातावरण पाहून त्यांना या शर्यतीची संकल्पना सूचली. परदेशात होणार्‍या मॅराथॉनच्या माध्यमातून प्रचंड संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये आरोग्यपूर्ण भोजन व आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश दिला जातो. रणबडिज्‌ मॅराथॉनचे आयोजन करताना मिळालेल्या व्यावसायिक अनुभवाचा उपयोग करून अरविंद यांनी एफएसएआय लाईफ अर्धमॅराथॉन स्पर्धेतही सहभाग घेतला आहे.

अरविंद बिजवे यांना भारतात आणि परदेशात 100 हून अधिक मॅराथॉन आयोजनाचा अनूभव आहे. एफएसएआयचे सदस्य आणि डीडीएस टेक्नॉलॉजी, इस्त्राईलच्या भारतीय विभागाचे प्रमुख त्रिलोकीनाथ तिवारी यांनी सांगितले की, या अर्धमॅराथॉनच्या माध्यमातून जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. फायर अॅण्ड सेक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया ही ना नफा  ना तोटा तत्वावर चालणारी संस्था असून या संस्थेचे 400 हून अधिक कॉर्पोरेट सदस्य व 3000 हून अधिक वैयक्तिक सदस्य आहेत. हे सर्व सदस्य फायर सेफ्टी आणि त्याच्याशी निगडित अग्निरोधक पदार्थ, आगप्रतिबंधक दरवाजे, पायपिंग सिस्टिम्स्‌, फायर सेंसर्स्‌, आगीची सूचना देणारे अलार्म, सीसीटीव्ही कॅमेरे, डोअर अॅक्सेस कंट्रोल, तसेच वीज पडल्यास करावी लागणारी उपाययोजना याच्याशी संबंधित यंत्रणा व डाटा अॅनालिटिक्स्‌च्या उत्पादनाशी संबंधित आहेत.

हे सर्व तंत्रज्ञान व यंत्रणा स्मार्ट बिल्डिंग आणि पंचतारांकित सुविधा असलेल्या गृहबांधणी प्रकल्पात वापरल्या जातात. त्यामुळेच पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून राबविल्या जाणार्‍या विविध योजनांसाठी औंध व बाणेर परिसरावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अशारितीने स्मार्ट पुणे शहरातील स्मार्ट नागरिकांसाठी जीवरक्षा व सुरक्षितता यासंबंधी संदेश देण्याचे काम या अर्धमॅराथॉन स्पर्धेच्या माध्यमातून केले जाणार आहे. किंबहुना एफएसएआय लाईफ अर्धमॅराथॉन स्पर्धा हे स्मार्ट मॅनेजमेंटचे उत्तम उदाहरण आहे.

या शर्यतीच्या निमित्ताने सेक्युरिटी शेल्स्‌चे संचालक व मॅराथॉन शर्यतीचे कार्यकारी अध्यक्ष महेश गव्हाणे, एफएसएआयच्या पुणे विभागाचे सचिव विरेंद्र बोराडे यांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे. एईओएन ग्रूपच्या माध्यमातून एफएसएआय लाईफ अर्धमॅराथॉन स्पर्धेचे उत्तम संयोजन करण्याकरिता विविध घटकांमध्ये समन्वय साधण्यात येत आहे.

एफएसएआय लाईफ अर्धमॅराथॉन स्पर्धेला पंचशील समूहाचा पाठिंबा लाभला आहे. तसेच, फायर सर्व्हिसेसचे संचालक डी.के. शमी यांचे सहकार्य लाभले आहे. एफएसएआय पुणे विभागाचे अध्यक्ष ऋषीकेश कुलकर्णी यांनी विविध माध्यमांतून या स्पर्धेला मदत केली आहे. तसेच, साकेत कम्युनिकेशन, सिक्स्थ एलीमेंट, रेडिओ सिटी यांचेदेखील सहकार्य लाभले आहे. ऑटोमेटेड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टिम्स्‌ विकसित करण्याकरिता मेक इन इंडिया उपक्रम राबवत असलेले रिअॅलिटी ऑटोमेशनचे संचालक नितीन जोशी यांनी या स्पर्धेला पुरस्कृत केले आहे. युनायटेड 21 यांनी हॉस्पिटल पार्टनर म्हणून पाठिंबा दिला आहे.

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ  इंजिनिअरिंग, लवळे, पुण्याच्या विद्यार्थ्यांनी व तसेच, एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ  इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, शिवाजीनगर एफएसएआय लाईफ अर्धमॅराथॉन स्पर्धेच्या प्रचार व प्रसारासाठी पुढाकार घेतला आहे. अक्षरा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनीसुद्धा या स्पर्धेला पाठिंबा दिला आहे.

Latest news
Related news