Bhosari: पिंपरी-चिंचवडमधील आणखी पाच रुग्ण ‘कोरोनामुक्त’ होऊन घरी रवाना!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयात 14 दिवसांचे उपचार घेऊन आठ रुग्ण ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत झाले आहेत. काल पाच रुग्णांच्या दुस-या चाचणीचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना आज (रविावारी) भोसरी रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाट करून या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे अभिनंदन केले व त्यांना घरी जाताना निरोप दिला. 

पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी (दि.27) पहिले तीन रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाले होते. तीन दिवसांत आठ रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाल्याने शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. तर, आणखी एका रुग्णाचा चौदा दिवसांनंतरचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. शहरात आता केवळ चार सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मागील आठ दिवसांत शहरात एकही नवीन ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळला नाही. ही आनंदाची बाब मानली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 12 मार्च रोजी कोरोनाचे पहिले तीन रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आढळले होते. लागोपाठ असे 12 रुग्ण कोरोना ‘पॉझिटीव्ह’ आढळल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर 14 दिवस उपचार घेतलेले रुग्ण ‘कोरोनामुक्त’ व्हायला सुरुवात झाली. त्यापैकी पहिले तीन रुग्ण शुक्रवारी ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत झाले. त्यांना घरी सोडण्यात आले. शनिवारी (दि.28) आणखी पाच रुग्णांचे 14 दिवसांनंतरचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आले होते. त्यांना आज (रविवारी) सकाळी घरी सोडण्यात आले.

या रुग्णाच्या घशातील द्रावाचे नमुने पुन्हा एकदा तपासणीसाठी ‘एनआयव्हीकडे’ पाठविण्यात आले होते. या दुस-या तपासणीत देखील त्यांचे रिपोर्ट ‘निगेटीव्ह’ आले आहेत. हे पाच रुग्ण पूर्णपणे ‘कोरोनामुक्त’ झाले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असून आता केवळ चार रुग्ण कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी आणखी एका रुग्णांचे रिपोर्टही निगेटीव्ह आले आहेत.उर्वरित दोन रुग्णांची प्रकृतीही स्थिर आहे.

दरम्यान, कोरोनाचे रुग्ण ठणठणीत होत असल्याने ही सर्वांत मोठी शहरवासीयांना दिलासा देणारी बाब मानली जात आहे. मागील आठ दिवसांपासून शहरात एकही नवीन ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहरात समाधानाचे वातावरण आहे. शहरात कोरोनाचे नवीन ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळत नसले. तरी, नागरिकांनी काळजी घ्यावी. घराबाहेर पडू नये. वारंवार हात धुवावेत. सूचनांचे पालन करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.