Chakan: भरधाव मोटारीची तीन दुचाकींना धडक, पाच जण ठार

एमपीसी न्यूज – चालकाचा ताबा सुटून भरधाव मोटारने रस्ता  दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या 3 दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघात पाचजणांचा बळी गेला आहे. ही धक्कादायक  घटना चाकण एमआयडीसी मध्ये खालुंब्रे गावच्या हद्दीत मंगळवारी (दि. 30) मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली.
चंद्रशेखर सूरज लाला विश्वकर्मा (वय 38 रा. भोसरी) सुनील परमानंद शर्मा (वय 43 रा. भोसरी) दीपनारायण हरिवंश विश्वकर्मा (वय 24 रा. चिखली) सत्यवान पांडे (वय 45 रा. मोरे वस्ती चिखलीे) सर्वज्ञ संजय विश्वकर्मा (वय 35 रा. चिखली पुणे) अशी या घटनेत ठार झालेल्या पाच जणांची नावे आहेत.
सुहास नामदेव शेवकर (राहणार शेवकर  वस्ती, नवलाख उंबरे, ता. मावळ) असे भरधाव मोटर चालकाचे नाव असून तो देखील गंभीर जखमी असून त्याच्यावर चाकण येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की सुहास शेवकर हा आपल्या ताब्यातील इर्टिगा मोटार (एमएच 14 जेएन 3768) ही चाकण औद्योगिक वसाहतीतील एचपी चौक ते शिंदे वासुली चौकाकडे घेऊन जात असताना (खालुंब्रे, ता. खेड) गावच्या हद्दीत त्याची मोटार रस्त्याच्या डिव्हायडरला धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस येऊन समोरून येणाऱ्या मोटरसायकल (एमएच 14 डीएल 1964 ,एमएच 14 डीई 2942, व एमएच 14 एजे 5149 या तीन दुचाक्यांना धडकून अपघात झाला. या अपघातात वरील पाच जण जागीच ठार झाले आहेत. बुधवारी (दि.१) सकाळी सहा वाजता या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.