Pimpri News : शून्य कचरा निर्माण करणाऱ्या शाळांना स्वच्छताकरात 50 टक्के सवलत देणार – महापालिका आयुक्त राजेश पाटील

भोसरीतील सिद्धेश्वर हायस्कूल ठरले झिरो वेस्ट निर्माण करणारे महाराष्ट्रातील पहिले हायस्कूल

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राबविलेल्या ‘संकल्प स्वच्छतेचा सुंदर भोसरीचा’ या उपक्रमांतर्गत सिद्धेश्वर इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये शून्य कचरा मोहिम राबविण्यात आली. ओला कचरा शाळेतच जिरविला जातो. सुका कचराही महापालिकेकडे दिला जात नाही. त्यामुळे झिरो वेस्ट निर्माण करणारे भोसरीतील सिद्धेश्वर हायस्कूल हे महाराष्ट्रातील पहिले खासगी हायस्कूल ठरले आहे. शाळेतूनच शून्य कचऱ्याचे संस्कार दिले जात आहेत, याचा अभिमान आहे. शून्य कचरा निर्माण करणाऱ्या शाळांना स्वच्छताकरात ५० टक्के सवलत दिली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी जाहीर केले.

वैशाली अजित गव्हाणे आणि आसरा फाउंडेशनच्या अर्चना मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरीतील सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये झिरो वेस्ट ही संकल्पना राबविण्यात आली. या शून्य कचरा प्रकल्पाचे मंगळवारी (दि.5) आयुक्त राजेश पाटील यांच्यासमोर सादरीकरण केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, प्राचार्या सुलक्षणा मुटकुले, सविता सस्ते आदी यावेळी उपस्थित होते.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, “शहर अतिशय वेगाने वाढत आहे. प्रचंड नागरीकरण होत आहे. शहर वाढत असताना पर्यावरणाचा समतोल राखला नाही. तर, त्याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. भविष्यातील पिढ्याची मोठी हानी होईल अशी परिस्थिती आहे. मोशी कचरा डेपोत कचऱ्याचे पर्वत आहेत. पुढील 50 वर्षात असे किती पर्वत बघायला मिळतील. त्यासाठी कचऱ्याचे व्यवस्थापन आपण स्वतःपासून केले नाही तर, भविष्यात जीवन जगण्याची पातळी खालावणार आहे. रोगराई वाढेल. निसर्ग, पर्यावरणात अनिश्चितता वाढली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. देशातील सर्वात स्वच्छ, सुंदर शहर करायचे आहे. त्यासाठी लोकांचाही प्रतिसाद मिळत असून प्रत्येक प्रभागात 90 टक्के कचऱ्याचे विलगीकरण होत आहे”.

“शून्य कचरा संकल्पना सर्वांना कळली आहे. स्वच्छतेची चळवळ सर्व शाळांमध्ये सुरू व्हावी. चळवळ सुरू झाल्यास नक्कीच आपले शहर स्वच्छ होईल. शहरातून इ प्रभाग सर्वात स्वच्छ, कचरा कुंडी मुक्त आहे. ओला, सुका, कचऱ्याचे 90 टक्के वर्गीकरण होते. शाळेतूनच शून्य कचऱ्याचे संस्कार दिले जात आहेत, याचा अभिमान आहे. शाळा शून्य कचरा निर्माण करणारी झालेली आहे. शाळेला मालमत्ता कराच्या स्वछता करात ५० टक्के सवलत दिली जाईल. शून्य कचरा उपक्रम राबविणाऱ्या शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. शहरातील शाळांना शून्य कचरा उपक्रम पाहण्यासाठी या शाळेला भेट देण्यास सांगितले जाईल”, असेही आयुक्त पाटील म्हणाले.

अजित गव्हाणे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प स्वच्छतेचा सुंदर भोसरीचा हा उपक्रम हाती घेतला. त्याअंतर्गत संपूर्ण प्रभागात ओला, सुका कचरा वेगळा करण्यासाठी डस्टबीनचे वाटप केले. कचरा वर्गीकरण करण्याबाबत जनजागृती केली. दुसऱ्या टप्प्यात या उपक्रमांतर्गत प्रभागातील सर्व मंदिरे शून्य कचरा निर्माण करणारी झाली आहेत. मंदिरातील निर्माल्याची जागेवरच विल्हेवाट लावून खत निर्मिती केली जाते. आता प्रभागातील शाळा शून्य कचरा निर्माण करणाऱ्या होत आहेत. पुढील टप्प्यात सर्व गृहनिर्माण संस्था शून्य कचरा निर्माण करणाऱ्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे लवकरच प्रभाग शून्य कचरा मुक्त होईल. महापालिकेवर आपल्या कचऱ्याचा भार पडणार नाही.”

शून्य कचरा मोहिम राबविणाऱ्या आसरा फाउंडेशनच्या अर्चना मोरे म्हणाल्या, “शून्य कचरा, ओला, सुका, घातक, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, वृक्षारोपण आणि सजावट, संस्कार वर्ग अशा सात समित्या तयार केल्या होत्या.शिक्षक, विद्यार्थ्यांना जैविक खत निर्मिती, कौशल्य विकास योजनेची माहिती दिली. विद्यार्थी दररोज स्वच्छतेसाठी एक तास देतात. शाळेतील कचऱ्याची विल्हेवाट शाळेतच लावली जात आहे. यापुढे महापालिकेला कचरा दिला जाणार नाही. ओला, घातक, सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. प्लॅस्टिक, पेपर, भंगार, धातु याचे वर्गीकरण केले जाते. त्यासाठी शाळेत गारबेज एरिया तयार केला आहे. या भागात भंगार एकत्रित ठेवले जाते. झाड लावण्यासाठी उपयोग केला जातो. उपयोग होत नसेल तर रिसायकल करण्यासाठी विकतो. निर्माल्य, ओल्या कचऱ्यातून खत तयार केले जाते. शून्य कचरा झालेली महाराष्ट्रातील पहिली खासगी शाळा आहे. महापालिकेकडे कोणताही कचरा न देता महापालिकेचा भार कमी केला आहे. या उपक्रमात महिलांचा मोठा सहभाग आहे”. यावेळी वैशाली गव्हाणे यांनीही मनोगत व्यक्त केले.

या उपक्रमासाठी सर्वाधिक पुढाकार घेणाऱ्या स्मिता कुर्ले या ब्रँड अँबेसिडर आहेत. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वाती जाधव यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.