Chakan : वाहतूक नियमनासाठी महामार्गावरील पोलीस ठाण्यांना प्रत्येकी 50 पोलीस देणार – संदीप पाटील 

पुणे नाशिक महामार्ग वाहतूक कोंडीवर उपाययोजना; पुण्यात जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक  

एमपीसी न्यूज – ग्रामीण भागातील अतिक्रमणे काढण्यासाठी तत्काळ पोलीस बंदोबस्त देण्याबरोबरच पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगावसह सर्वच प्रमुख पोलीस ठाण्यात किमान 50 पोलीस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी बुधवारी (दि. 29) खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत दिले. 

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाकण, राजगुरुनगर, नारायणगावसह जिल्ह्यातील सर्वच महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर समितीचे अध्यक्ष खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीत आढळराव यांनी चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव, वाघोली या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न अतिशय गंभीर झाला असल्याकडे लक्ष वेधून अतिक्रमणे आणि अवैध वाहतूक करणारी वाहने चौकात पार्किंग केल्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते, याबाबत पोलीस प्रशासन काय उपाययोजना करणार आहे, अशी विचारणा केली.

या संदर्भात पोलीस अधीक्षक पाटील यांनी नगरपरिषद व मोठ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अतिक्रमणे काढण्यासाठी मागणी येताच तात्काळ पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल, असे सांगून वाहतूक नियंत्रण करण्यासाठी महामार्गावरील प्रत्येक पोलीस ठाण्याला पन्नास पोलीस उपलब्ध करून दिले जातील. मात्र स्वयंसेवी संस्था अथवा नागरिकांनी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, परस्पर वाहतूक नियंत्रण करू नये, अशी सूचनाही केली.

या बैठकीच्या सुरूवातीलाच खासदार आढळराव पाटील यांनी पुणे-नाशिक रस्त्यावर राजगुरुनगर शहर आणि घाटात तसेच मंचर, नारायणगाव येथे मोठे-मोठे खड्डे  पडले असून या खड्ड्यांमुळेही वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना हे खड्डे भरून तत्काळ रस्ते दुरुस्त करण्यास सांगितले. त्यानुसार प्राधिकरणाने खडे भरण्याचे काम आजपासून सुरू केले असल्याची माहिती प्रकल्प व्यवस्थापक झगडे यांनी दिली.

अवैध प्रवाशी वाहतुकीबाबत नाराजी

_MPC_DIR_MPU_II

अवैध वाहतूक आणि बेशिस्त पार्किंगबाबत स्थानिक पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याबद्दल  आढळराव पाटील यांनी नापसंती व्यक्त करीत भोसरी ते चाकण दरम्यान जवळपास सहा आसनी रिक्षा व जीप, कार अशी १ हजार २०० वाहने बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करतात, असे सांगून ही वाहने चौक अडवून रस्त्यावरच आपली वाहने पार्क करतात, परिणामी रस्ता अडवला जाऊन वाहतूक ठप्प होते.

विशेष म्हणजे हे सर्व चौकातील वाहतूक पोलिसांच्या समक्ष होत असताना ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात अशा स्पष्ट शब्दात आढळराव  यांनी पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढले. तसेच बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या या वाहनचालकांना कुणाचे पाठबळ आहे, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. राजगुरुनगर व चाकण नगरपरिषद आणि दोन्ही पोलीस ठाण्यांना पत्र देऊन या दोन्ही ठिकाणची चौकातील अतिक्रमणे काढण्याची मागणी केली आहे.  सद्यस्थितीत तातडीची बाब म्हणून चाकण ते मोशी दरम्यानच्या वाहतूक नियंत्रणासाठी किमान २०-२२ पोलीस उपलब्ध करून देण्याची सूचना पिंपरी चिंचवडच्या वाहतूक पोलीस उपायुक्तांना केली.

जिल्ह्यातील प्रमुखांची उपस्थिती

खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, खासदार अमर साबळे, आमदार भीमराव तापकीर, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे,  पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, आनंदराव पाटील, पुण्यातल्या वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, पिंपरी-चिंचवडच्या वाहतूक पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, संदीप दिवाण, शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, समिती सदस्य रणजित गाडगीळ, समन्वयक गणेश सांडभोर, चाकणचे नगराध्यक्ष शेखर घोगरे, उपजिल्हाप्रमुख रवींद्र करंजखेले, चाकण उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, नगरसेवक धीरज मुटके, राहुल गोरे आदी उपस्थित होते.

तर पोलीस अधीक्षकांशी साधा संपर्क – संदीप पाटील

राजगुरुनगर येथील वाहतूक नियंत्रणासाठी नगरपरिषदेने 15 वॉर्डन उपलब्ध करून दिले आहेत. त्याप्रमाणे चाकण नगरपरिषदेसह मोठ्या ग्रामपंचायतीनीही ट्राफिक वॉर्डन द्यावेत अशी सूचना पोलीस अधीक्षक सदीप पाटील यांनी केली. जिल्ह्यात 900 नवीन होमगार्डची भरती करण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. हे प्रशिक्षण पूर्ण होताच त्यांचा वापर वाहतूक नियंत्रणासाठी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नागरिकांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसेल तर 9604303333 या आपल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही पोलीस अधीक्षक पाटील यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.