Pune News : उच्चभ्रू सोसायट्यातून महागड्या सायकली चोरायचा, 51 वर्षीय चोरटा अटकेत

एमपीसी न्यूज : कोंढवा पोलिसांनी उच्चभ्रु सोसायट्यांमधून महागड्या सायकल चोरणाऱ्या एकाला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून तब्बल 19 सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. तर, दहा गुन्ह्यांची उकल केली आहे. कोंढवा, मुंढवा आणि वानवडी परिसरातून या सायकली त्याने चोरल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.

रज्जाक सादर रज्जाक शेख (वय 51, रा. कोंढवा, मूळ उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात जारा शोएब खान (वय 33, रा. साळुंखे विहार) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साळुंखे विहार रस्त्यावरील ग्रीन एकर सोसायटीत राहतात. काही दिवसांपूर्वी ते दुबईला गेले होते. त्यांच्या मुलाने त्याची सायकल सोसायटीच्या आवारात लावली होती. यावेळी अज्ञाताने सोसायटीच्या आवारातून त्यांच्या मुलाची सायकल चोरून नेली. त्या दुबईहून आल्यानंतर हा प्रकार समोर आला व त्यांनी पोलीसांकडे तक्रार केली.

कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला सुरवात केली. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता आरोपीची ओळख पटली. रज्जाक याने सायकल चोरी केली आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली असून, तो सध्या लंगडत चालत आहे. त्याचा शोध घेत असताना तो कोंढवा खुर्द येथील विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात असल्याची माहिती मिळाली. लागलीच पथकातील पोलीस नाईक निलेश देसाई, पोलीस कर्मचारी जोतिबा पवार, सतीश चव्हाण यांनी त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने विविध भागातून सायकल चोरल्याचे समोर आले. त्याच्याकडून तब्बल 19 सायकली जप्त केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.