Crime News : पुणे पोलिसांच्या कोम्बींग ऑपरेशनमध्ये 547 आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी आयुक्तालय परिक्षेत्रात कोम्बीग ऑपरेशन राबवले असून यात पोलिसांनी 3 हजार 381 गुन्हेगारांची तपासणी करत दोषी 547 गुन्हेगारांना अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवार (दि.12) रात्री दहा ते शनिवारी (दि.13) पहाटेपर्यंत करण्यात आली.

यामध्ये पुणे आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा पथक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक,वाहतूक शाखा आदी पथकांनी कारवाई केली.हॉटेल,लॉजेस, ढाबे, बस स्थानके, रेल्वे स्थानके येथे संशयीतरित्या फिरणाऱ्या व्यक्तींची तपासणी यात करण्यात आली.

या  कोम्बींग ऑपरेशनमध्ये आर्म अक्ट अंतर्गत दोन आरोपींना अटक करत त्यांच्याकडून दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा 90 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.दुसऱ्या कारवाईत 35 आरोपींना अटक केली यात 29 कोयते, 2 तलवारी, 2 पालघन, 1 खंजीर, दुचाकी, मोबाईल असा एकूण 37 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. स्वारगेट पोलीस ठाणे परिक्षेत्रात 1 पिस्तुल व 1 जिवंत काडतुस असा 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

तसेच दारूच्या अड्ड्यावर कारवाई करत 18 केसेसमध्ये 11 आरोपींना अटक करत 24 हजार 829 रुपयांची 167 लीटर दारु जप्त केली आहे.तर जुगार अड्डयावरील कारवाईत 5 आरोपींवर कारवाई करत 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाकाबंदीमध्ये पोलिसांनी 21 जणांकडून 71 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.तर हॉटेल व ढाब्यावरील निर्जन स्थळांचीही तपासणी यात केली गेली.दरोडा वाहनचोरी विरोधी पथकाने एका सराईत व विधी संघर्षीत बालकाला ताब्यात घेत त्यांच्याजवळून 1 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.यात पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी पथकाने रेकॉर्डवरील एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच सीआरपीसी कायद्याप्रमाणे 102 आरोपींविरोधात कारवाई कऱण्यात आली. तसेच शहरात वावरणाऱ्या एकूण 13 तडीपार गुंडानाही अटक करण्यात आली आहे. वाहतुक शाखेनेही कोंबीग ऑपरेशन दरम्यान 1 हजार 294 जणांची तपासणी केली. ज्यामध्ये 1 लाख 16 हजार 100 रुपयांचा दंड आकारण्यात आला.

 

यापुढेही पोलीस सतर्कतेने आरोपींवर कारवाई करणार असून कोठेही अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरीत पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.