Chinchwad : नात्यामधील विश्वासाचे महत्व अधोरेखित करणारे नाटक ‘थ्रो बॅक’

58 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा आढावा. दिवस तिसरा

(विराज सवाई)

एमपीसी न्यूज- प्रत्येक नातं हे विश्वासाच्या पायावर आधारलेलं असतं आणि तो जोपर्यंत अढळ आहे तोपर्यंत नात्यातली विण कधीही सैल होत नाही. अगदी कुठल्याही परिस्थितीत पून्हा उठून उभं राहण्याची, नव्याने आयुष्य सुरू करण्याची उमेद मिळते. पण, विश्वास असेल तरच ! 58 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत तिस-या दिवशी अ. भा. मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचं अक्षय जोशी लिखित, राजेश शिंदे दिग्दर्शित ‘थ्रो बॅक’ हे नाटक सादर झालं.

गोष्ट तशी अगदी साधी.गंधार निषाद पाटणकर नावाचा एक साधारण पंचविशीतला मुलगा, पुण्यापासून लांब अश्या गावात असलेल्या पिढीजात वाड्याची कागदपत्रं बँकेतून घेण्यासाठी दहा दिवसांची सुट्टी घेऊन आलेला असतो. त्याच्या वडिलांचे (निषाद पाटणकरांचे) गावातले मित्र माधव साने गंधारसाठी वाडा साफ करून घेतात, त्याला खोली दाखवून परत जातात.एवढा मोठा वाडा गंधार आवाक होऊन कुतुहलाने बघू लागतो. तेवढ्यात त्याला एका खोलीतून मोठ्या आवाजात शास्त्रीय संगीत ऐकू येतं. शेजा-यांना आवाज कमी करण्यासाठी ओरडून बघतो शेवटी वैतागून तोही अजून मोठ्या आवाजात धांगडधिंग्याची गाणी लावतो.

थोड्या वेळाने हा गोंधळ ऐकून शेजारच्या खोलीतून विश्वनाथ नावाचा तोही साधारण पंचविशीचा पण ६०-७० च्या दशकातला वाटावा असा तरूण प्रवेश करतो. आणि आरडाओरडा करत गंधारच्या खोलीत येतो.गंधार त्याला हा वाडा माझ्या वडलांचा म्हणजे निषाद पाटणकरांचा असल्याचं सांगतो. तर विश्वनाथ हा वाडा त्याच्या वडलांचा म्हणजे गोरखनाथ पाटणकरांचा असल्याचं सांगतो. थोडावेळ वाक्-युद्ध झाल्यावर दोन्ही पाटणकरांचा हा वाद थांबतो.

विश्वनाथ हा आत्ताच्या तुलनेत खूप जुन्या काळात जगणारा उदा. ग्रामोफोन वर तबकड्या लाऊन गाणी ऐकणारा, लॅपटॅाप आणि मोबाइल फोन माहिती नसणारा आणि(वापरत नसला तरी माहितच नाही ही गोष्ट आत्ताच्या काळात न पटणारी वाटते) लॅंडलाईन वापरणारा, चार-चार तास संगीत नाटकं वगैरे पाहणारा असा दाखवला आहे. हळुहळु त्यांच्यात मैत्री होते. आणि दोघेही सारख्याच वयाचे असल्यामुळे विषयांची गाडी आपोआपच मुली, लग्न यांकडे येते.

विश्वनाथ त्याला आवडत असलेल्या मुलीला(सुनीताला) प्रेमपत्र लिहून पाठवतो तर गंधार त्याला त्याची गर्लफ्रेंड व्हॅाट्सअॅप वरंच कशी पटली हे मोठ्या अभिमानाने सांगत असतो.अर्थात मुळात मोबाइलच माहीत नसणा-या विश्वनाथला गंधारच्या या आणि अशा अनेक गोष्टी डोक्यावरून जातात. त्यामुळे हे कथानक सरळ सरळ भिन्न काळांमध्ये असलेल्या दोन व्यक्तींमध्ये चाललेंलं संभाषण आहे हे सुरवातीलाच चाणाक्ष प्रेक्षकांच्या सहज लक्षात येतं.
मग पुढे हाताने गंमत ला(आवडत्या मुलीला)पत्रं देण्यातली गंमत आणि मेसेज वर ‘मला तू आवडतेस. तुझा काय सीन आहे?!’ किंवा ‘तुझ्या आधीच्या पसा-याबद्दल मला काहीच प्रॅाब्लेम नाहीये.’ अशी जुन्या काळात असणा-या विवेकबुद्धिची आणि नात्यातल्या खरेपणाची आणि आताच्या काळातल्या कसलाही विधिनिषेध नसणा-या गोष्टींची तुलना करत नाटक हळुहळु पकड घेत जातं. आणि नातं टिकण्यासाठी फक्त ख-या प्रेमाची आवश्यकता असते या नोटवर नाटक संपतं.

फ्लॅशबॅक पद्धतीनं दाखवलेले विश्वनाथ-सुनीताच्या भेटीचे प्रसंग सुरेख खुलवले आहेत. विश्वनाथची भूमिका साकारणा-या सुबोध पवारने ७०च्या दशकातल्या तरूणाचं पात्रं मेहनतीने जिवंत केलं आहे. स्वरूप कडगंचीचा गंधार भूमिकेची पकड घेत नाही. सानेंची भूमिका चांदगुडे यांनी उत्तम पेलली आहे.सुनीता आणि आभा या दोन्ही व्यक्तीरेखांमधलं वेगळेपण दिप्ती नातू हिने प्रयत्नपूर्वक उभं केलं आहे.
प्रेडिक्टेबल असूनही एक चांगला प्रयत्न म्हणून थ्रो बॅक या नाटकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

उद्याचं नाटक ध्यास प्रस्तुत शौझिया.

(क्रमशः)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.