Chinchwad News : वर्षभरात घरफोडीचे 59 टक्के गुन्हे ‘अनडिटेक्ट’

एमपीसी न्यूज – चालू वर्षात पिंपरी चिंचवड शहरातील 15 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 353 घरफोड्या झाल्या. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेही दाखल करण्यात आले. घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांना अपयश येत आहे. तब्बल 59 टक्के गुन्हे अजूनही उघड झालेले नाहीत. दाखल असलेल्या 353 पैकी केवळ 147 गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. हे प्रमाण 41 टक्के एवढे आहे.

जानेवारी ते डिसेंबर 2021 या काळात शहरातील 15 पोलीस ठाण्यात 353 घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. त्यातील 40 घरफोड्या दिवसा घडल्या आहेत. तर 315 घरफोड्या रात्रीच्या वेळी घडलेल्या आहेत.

दिवसा झालेल्या घरफोडयांमध्ये 15 गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले. हे प्रमाण 38 टक्के आहे. 62 टक्के गुन्हे अनडिटेक्ट आहेत. तर रात्रीच्या वेळी झालेल्या 315 घरफोडयांपैकी 132 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. हे प्रमाण 42 टक्के आहे.

मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर 2020 या कालावधीत 271 घरफोडीच्या गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद आहे. त्यातील 119 गुन्हे उघडकीस आले. त्यात दिवसा 36 तर रात्रीच्या वेळी 235 घरफोड्या झाल्या होत्या.

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्ह्यांची आकडेवारी वाढली आहे. लॉकडाऊन मध्ये शिथिलता मिळाल्यानंतर या घरफोड्या वाढल्या असल्याचे चित्र आहे. घरफोडी करणारे चोरटे एखाद्या परिसरात रेकी करून घरे हेरतात आणि वेळ साधून चोरी करतात, अशा काही गुन्हेगारांना पोलिसांनी अटकही केली आहे. जानेवारी, ऑगस्ट आणि नोव्हेंबर या तीन महिन्यात घरफोडीचे सर्वाधिक गुन्हे दाखल झाले.

यावर्षी घडलेल्या घरफोड्या –
जानेवारी – 40
फेब्रुवारी – 27
मार्च – 18
एप्रिल – 21
मे – 17
जून – 21
जुलै – 27
ऑगस्ट – 46
सप्टेंबर – 30
ऑक्टोबर – 34
नोव्हेंबर – 42
डिसेंबर – 30

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.