Six Airbags Compulsory : आता कारमध्ये 6 एअर बॅग्स अनिवार्य, नितीन गडकरी यांची माहिती

एमपीसी न्यूज – वाहन चालक सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. ज्या वाहनांमधून आठ प्रवासी वाहतुक होते अशा वाहनांमध्ये आता 6 एअर बॅग्स असणं अनिवार्य असणार आहे. प्रवास सुरक्षित होण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘मी 8 प्रवाशांपर्यंत वाहतूक करणाऱ्या मोटार वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यासाठीच्या जीएसआर अधिसूचनेचा मसुदा आज मंजूर केला आहे.’ असे ट्विट मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केल आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने याआधीच 1 जुलै 2019 पासून चालक एअरबॅग आणि 01 जानेवारी 2022 पासून चालकासमोरील सह-प्रवासी एअरबॅगच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती.’

चारचाकी गाडींमध्ये पुढील आणि मागील दोन्ही कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या प्रवाशांना टक्करांचा प्रभाव कमी करण्यासाठी, M1 वाहन श्रेणी म्हणजेच आठ आसनी वाहनामध्ये 4 अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील वाहनांना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एअरबॅग नियमांमुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक चांगली होईल असेही गडकरी यांनी सांगितले.

भारतात लो बजेट किंवा लहान कार खरेदी केल्या जातात त्यात साधारण दोन एअरबॅग्स असतात. ऑटोमेकर्स फक्त मोठ्या आणि महागड्या कारमध्येच जास्त एअरबॅग देतात. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याआधीच लहान आणि स्वस्त कारमध्येही सहा एअरबॅग्स देण्याचं आवाहन कार उत्पादक कंपन्यांना केलं होतं. आता या वाहनांमध्ये 6 एअरबॅग दिल्या गेल्या तर त्यांच्या किमती नक्कीच वाढण्याची शक्यता आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.