Pune News : पुण्यात घरफोडीच्या 6 घटना उघडकीस, 8 लाखांचा मुद्देमाल लंपास

एमपीसी न्यूज : पुणे शहरात घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मागील काही दिवसांपासून दररोज दोन ते तीन घरफोडीच्या घटना उघडकीस येत आहेत. आज पुन्हा एकदा घर फोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. बंडगार्डन, अलंकार, सिंहगड, विश्रांतवाडी आणि बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या या घटनांमध्ये 8 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे

बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ताडीवाला रोड येथील कुमार पिनॅकल या सोसायटीतील एक फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचांदीचे दागिने असा एकूण दोन लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी अनुप शेषराव जोगदंड (वय 36) यांनी फिर्याद दिली आहे. तर बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक फोर व्हिलर सर्विस सेंटर फोडून चोरट्यांनी होम थेटर, गिअरबॉक्स, सीसीटीव्ही कॅमेरे असा एकूण चार लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी हार्दिक भारत मेहता (वय 36) यांनी फिर्याद दिली आहे.

याव्यतिरिक्त सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चाकणकर कॉर्नर या इमारतीतील फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडला. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. तर सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चंद्रमा संकुल या इमारतीतील फ्लॅट फोडून चोरट्यांनी 38 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याशिवाय विश्रांतवाडी आणि अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या घरफोड्या मध्ये तब्बल बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.