PCMC News: अनुकंपा, लाड-पागे अंतर्गत महापालिकेत 600 जणांना नोकरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनुकंपा वारस नियुक्ती, लाड-पागे वारस अंतर्गत वर्ग 3 आणि वर्ग 4 मध्ये थेट नियुक्ती दिली जाते. महापालिकेत गेल्या पाच वर्षांत लाड-पागे आणि वारस नियुक्ती अशा एकूण 604 जणांना महापालिका सेवेत नोकरी करण्याची संधी मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवड आस्थापनेवरील एकूण 7 हजार 84 अधिकारी व कर्मचारी आहेत. तसेच बालवाडी शिक्षक, मानधन, कंत्राटी अधिकारी, कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी असे सुमारे तीन हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. महापालिका सेवेतून दरमहा 15 ते 20 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त होत असतात. दुसरीकडे गेल्या 20 वर्षांत महापालिका सेवेतून तब्बल पाच हजार पेक्षा जास्त कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे सध्य स्थितीत महापालिकेतील विविध विभागामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बोलबाला सुरू आहे.

लाड-पागे म्हणजे काय?

सफाई कामगार व अस्वच्छ व्यवसायातील कामगारांच्या कामाबाबत व सेवांबाबत विचार करण्याकरिता लाड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. महापालिकेत सरळसेवा, लाड-पागे वारस नियुक्ती अंतर्गत आणि मयत झालेल्या कर्मचाऱ्याच्या जागी त्याच्या कुटूंबातील पात्र इच्छूकाला अनुकंपा तत्वावर महापालिका सेवेत घेतले जाते. राज्य सरकारने सरळ सेवेने भरती करण्यासंदर्भात बंदी उठविल्यानंतर पालिका प्रशासनाने विविध पदांसाठी सरळ सेवेने भरती प्रक्रिया सुरू आहे. असे असले तरी लाड-पागे वारस नियुक्ती आणि अनुकंपा तत्वावर भरती प्रक्रिया निरंतर सुरू असते. लाड-पागे वारस नियुक्तीमधून गेल्या पाच वर्षात वर्ग तीन मधून 66 तर वर्ग चार मधून 387 अशा 453 जणांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर अनुकंपा वारस नियुक्ती वर्ग तीनमधून 67 तर वर्ग चारमधून 84 अशा 151 जणांना महापालिका सेवेत नोकरी संधी मिळाली आहे.

लाड-पागे अंतर्गत अशी केली जाते नियुक्ती?

लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार 11 मार्च 2016 अन्वये सफाई कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्त झालेल्या, स्वेच्छा सेवानिवृत्ती घेणाऱ्या किंवा सेवेत असताना निधन पावलेल्या सफाई संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती देण्यात येत होती. मात्र, यामध्ये राज्य सरकारने 2021 मध्ये बदल केला. नवीन नियमात अनुसूचित जाती व्यतिरीक्त अन्य प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसास वारसा हक्काने नियुक्ती देण्याची तरतूद नाही. मात्र, गेल्या पाच वर्षात वर्ग तीन मधून 66 तर वर्ग चार मधून 387 अशा 453 जणांना नियुक्ती देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.