महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात साकारली 61 किलो चक्क्याची शंकराची पिंड

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे चक्केश्वराची पूजा

एमपीसी न्यूज –  बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात 61 किलो चक्क्याची शंकराची पिंड आणि फळा-फुलांची आरास करण्यात आली. सुकामेवा, केशर, फळे आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करुन साकारण्यात आलेली ही चक्केश्वराची पूजा पाहण्याकरीता शुक्रवारी सकाळपासून भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली.

एकलव्य फाऊंडेशनमधील मुलांच्या हस्ते मध्यान्न आरती करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.एन. डी. पाटील, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, खजिनदार बाळासाहेब गायकवाड, उत्सव प्रमुख अ‍ॅड. अंकुश काकडे, उपउत्सवप्रमुख चंद्रशेखर हलवाई, विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, शिरीष मोहिते, उल्हास कदम, नंदकुमार सुतार यांसह कर्मचारी उपस्थित होते.

मंदिरातील भुंजगराव जोशी गुरुजी, उमेश धर्माधिकारी, शत्रुघ्न सोनावणे, लक्ष्मीबाई पत्की, शोभा गाडेकर, भारती माटे, व्यवस्थापक विजय पाचंगे यांनी ही चक्क्याची शंकराची पिंड आणि आरास अवघ्या दोन तासांत साकारली.

अ‍ॅड.एन. डी. पाटील म्हणाले, महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात दरवर्षी चक्केश्वराची पूजा करण्यात येते. यावर्षी 61 किलो चक्का वापरुन शंकराची पिंड साकारण्यात आली. यामध्ये बदाम, द्राक्षे, केशर, कवठ यांसह विविध प्रकारच्या फुलांचा वापर देखील करण्यात आला आहे. या चक्क्याचे श्रीखंड करुन हा प्रसाद एकलव्य फाऊंडेशन, आपलं घरं, स्वाधार आणि वंचित विकास या स्वयंसेवी संस्थांना देण्यात येणार आहे. तसेच मंदिरात येणा-या भाविकांना देखील हा प्रसाद देण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.