डेबिट कार्डची माहिती विचारून फसवणूक करणा-यास अटक ; 63 गुन्हे केल्याचे निष्पन्न

एमपीसी न्यूज – नागरिकांना फोन करून त्यांच्या डेबिट कार्डविषयीची गोपनीय माहिती घेऊन बँक खात्यातून परस्पर पैसे काढणा-यास पुणे शहर सायबर क्राईमच्या कर्मचा-यांनी जेरबंद केले. यावेळी आरोपीच्या ताब्यातून 36 सिमकार्ड, 8 मोबाईल हॅण्डसेट आणि 2 लॅपटॉप हस्तगत केले. आरोपींवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बोपखेल येथील प्रकाश जांभळे यांना मागील दोन महिन्यांपासून पेन्शन 121 रुपयाने कमी मिळत होती. त्यांनी याविषयाची तक्रार www.complaintboard.in या वेबसाईटवर नोंदवली होती. तक्रार देताना त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचा अकाऊंट क्रमांक आणि मोबाईल क्रमांक दिला होता. त्यानंतर त्यांना लगेच एक फोन आला आणि त्यांच्याशी बोलत असताना संबंधित व्यक्तिने त्यांच्याकडून बँक खात्याविषयीची गोपनीय माहिती विचारून घेत अकाऊंटमधून 45 हजार 158 रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. जांभळे यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

या घटनेचा तपास करत असताना सायबर क्राईमच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी गुलबर्गा कर्नाटक येथून शिवप्रसाद शंकरअप्पा माडगी (वय-28) याला ताब्यात घेतले. आरोपीने Indian Consumer Complaint Bord या साईटवर ज्या ग्राहकांनी तक्रारी दाखल केल्या त्या ग्राहकांना फोन करून त्यांच्या तक्रारी दूर करण्याच्या आमिषाने ग्राहकांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती विचारत त्यांना गंडा घातला होता. आरोपीने अशाप्रकारे आतापर्यंत 63 जणांची फसवणूक केली आहे.

दिघी पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.