Mpc News Vigil : चोऱ्या वाढल्या, चोरटे सापडेनात, 63 टक्के घरफोड्यांची उकल नाही!

पोलिसांकडून गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण अत्यंत कमी

एमपीसी न्यूज – चालू वर्षात पिंपरी चिंचवड शहरातील 15 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 241 घरफोड्या झाल्या. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेही दाखल करण्यात आले. घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांना अपयश येत आहे. तब्बल 63 टक्के गुन्हे अजूनही उघड झालेले नाहीत. दाखल असलेल्या 241 पैकी केवळ 90 गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. हे प्रमाण 37 टक्के एवढे आहे.

जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या काळात शहरातील 15 पोलीस ठाण्यात 241 घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. त्यातील 33 घरफोड्या दिवसा घडल्या आहेत. तर 208 घरफोड्या रात्रीच्या वेळी घडलेल्या आहेत.

दिवसा झालेल्या घरफोडयांमध्ये सात गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले. हे प्रमाण 21 टक्के आहे. 79 टक्के गुन्हे अनडिटेक्ट आहेत. तर रात्रीच्या वेळी झालेल्या 208 घरफोडयांपैकी 83 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. हे प्रमाण 40 टक्के आहे.

मागील वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत 348 घरफोडीच्या गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद आहे. त्यातील 122 गुन्हे उघडकीस आले. त्यात दिवसा 50 तर रात्रीच्या वेळी 298 घरफोड्या झाल्या होत्या.

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्ह्यांची आकडेवारी कमी दिसते. यासाठी कोरोना काळातील लॉकडाऊन हे महत्वाचे कारण आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वजण आपापल्या घरात बंद होते. कामोकामीच रस्त्यावर, बाजारात यायचे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद मिळत होता. त्यामुळे लॉकडाऊन काळात घरफोडयांचे गुन्हे कमी दाखल झालेले दिसतात.

एप्रिल ते ऑगस्ट या काळात घरफोडीचे गुन्हे कमी दाखल झाले. एप्रिल महिन्यात मागील वर्षी 30 तर यावर्षी 9, मे महिन्यात मागील वर्षी 38 तर यावर्षी 7, जून महिन्यात मागील वर्षी 37 तर यावर्षी 14, जुलै महिन्यात मागील वर्षी 37 तर यावर्षी 16, ऑगस्ट महिन्यात मागील वर्षी 38 तर यावर्षी 22 घरफोड्या झाल्या.

लॉकडाऊनमधून बहुतांश प्रमाणात सूट मिळाल्यानंतर सर्वजण घराबाहेर पडले. त्यानंतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात घर बंद करून गावी गेलेल्या लोकांनी लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर शहरात आल्यावर निदर्शनास आलेल्या घटना देखील ऑगस्ट-सप्टेंबर किंवा त्यानंतर दाखल केल्या आहेत.

यावर्षी घडलेल्या घरफोड्या –
जानेवारी – 35
फेब्रुवारी – 28
मार्च – 23
एप्रिल – 9
मे – 7
जून – 14
जुलै – 16
ऑगस्ट – 22
सप्टेंबर – 36
ऑक्टोबर – 26
नोव्हेंबर – 26

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.