Pimpri: देहू, आळंदी व पंढरपूरच्या विकासासाठी निधी देण्याची खासदार बारणे यांची संसदेत मागणी

एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र देहु, आळंदी व पंढरपूर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी व तीर्थक्षेत्राच्या सुधारणांसाठी केंद्र सरकारने जास्त निधी द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.

लोकसभेच्या ‘शून्य’ प्रहरात खासदार श्रीरंग बारणे यांनी ही मागणी केली. बारणे म्हणाले, “वारक-यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी विविध ठिकांणाहुन भाविक दर्शनासाठी येतात. आषाढी व कार्तिक एकादशीला या ठिकांणी मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातुन 10 ते 15 लाख वारकरी भाविक येतात. श्री क्षेत्र देहू येथून श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी व श्री क्षेत्र आळंदी येथुन संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा निघतो. तसेच महाराष्ट्र, कर्नाटकामधुन जवळपास 200 हुन अधिक पालख्या 20 ते 25 दिवस पायी चालत येतात. या पालख्या सोबत लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूरला चालत दर्शनासाठी येत असतात”

“पंढरपूर यात्रेदरम्यान यात्रेकरूंसाठी सुविधांचा मोठा अभाव आहे. या यात्रेकरूंसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालय, व अन्य सुविधा त्यांना मिळत नाही. त्या सुविधा पुरविण्यासाठी मोठ्या आर्थिक निधीची आवश्यक्ता असल्याने श्री क्षेत्र देहु, आळंदी व पंढरपूर या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या वतीने जास्तीत जास्त आर्थिक निधी देण्यात यावा” अशी मागणी बारणे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.