Pune : स्वातंत्र्यदिनी हिमालयावर फडकणार तिरंगा

दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्था सर करणार हिमालयातील 20 हजार फूट उंचीवरील माऊंट युनाम शिखर

एमपीसी न्यूज- पुण्यातील दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने हिमालयातील 20 हजार 100 फूट उंचीचे माऊंट युनाम शिखर सर करण्याचा निश्चय केला आहे. या मोहिमेचे खास वैशिष्ट्य म्हणजे 14 फूट उंच व 25 फुट लांब राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकविण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वरती नेऊन त्याचे पूजन केले जाणार आहे. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील पिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या मोहिमेसाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. 7 ऑगस्ट 2018 ते 20 ऑगस्ट 2018 दरम्यान ही मोहीम राबविण्यात येणार असून 15 ऑगस्ट या दिवशी मोहीम फत्ते करण्याचे नियोजन आहे. या मोहिमेत नऊ जण सहभागी होणार आहेत.

या मोहिमेबाबत माहिती देताना सुनील पिसाळ म्हणाले, ” मोहिमेचे खास वैशिष्ट्य म्हणजे 14 फूट उंच व 25 फुट लांब राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकावून या शिखरावर स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे ठरवले आहे. या ध्वजासाठी लागणारा लोखंडी खांब व पूर्ण ध्वज हा आम्ही स्वतःच्या अंगावर घेऊन जाणार आहोत. खांबाचे अंदाजे वजन चौदा ते सोळा किलो पर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वरती नेऊन त्याचे पूजन करून शिव घोषणा देणार आहोत, त्याच प्रमाणे संस्थेचे सदस्य गोपाल भंडारी हे स्वतः गीटारवर राष्ट्रगीत सादर करणार आहेत ” या मोहिमेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पिसाळ यांनी व्यक्त केला.

दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्था 1993 साली स्थापन करण्यात आली. संस्थेमार्फत सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक मोहिमा व रिबोल्टिंग सारखे उपक्रम राबवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दुर्ग संवर्धन संबंधाने जनजागृती केली आहे. किल्ले तसेच इतर भागांमध्ये झाडे लावून त्यांचे संगोपन करणे त्याचप्रमाणे लिंगाणा, वजीर, हडबीची शेंडी, नवरा नवरी सुळका, कळकराय ह्या सारखे अवघड सुळके सर करणे असेही उपक्रम राबवण्यात येत आहेत. तसेच लिंगाणा या भव्य किल्ल्यावरील शिवकालीन पण आत्ताच्या काळात अज्ञात असलेल्या गुहा शोधण्याचे कामही संस्थेमार्फत यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.