Alandi : मोबाईल एटीएमचा वारकऱ्यांना ‘समर्थ’ आधार

(अमोल अशोक आगवेकर)

एमपीसी न्यूज- संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज पालख्यांचा पायी वारी सोहळा नुकताच आनंदात झाला. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून आलेले वारकरी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ चा जयघोष करत पंढरीला पोहोचले आणि विठूरायाचं दर्शन घेऊन आपापल्या ठिकाणी परतलेही. समाजाच्या प्रत्येक स्तरांतील भाविक, श्रद्धाळू, हौसे-नवसे-गवसे या आनंद सोहळ्यात सहभागी होत असतात त्यामुळे वारकऱ्याला आपल्या जवळचे पैसे सुरक्षित रहावे आणि न परत घरी जाईपर्यंत ते पुरावेत अशा दोन गोष्टींची चिंता असते. या वर्षी मात्र सोलापूरच्या समर्थ सहकारी बँकेने वारकऱ्यांना मोबाईल एटीएम सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्या पैशांच्या चिंतेचे ओझे कमी केले.

‘आषाढी वारीवा 10 दिवस बाकी असताना एका बैठकीत बँकेचे सीईओ उमेश थोब्बी आणि सीजीएम आनंद एकबोटे यांनी मोबाईल एटीएम उपक्रमाची कल्पना मांडली आणि ती सर्वांनी उचलून धरली. लगेचच ही सुविधा देण्याचा निर्णय वरिष्ठांनी पक्काही केला,’ अशी माहिती बँकेच्या सोलापूर मुख्यालयातील तांत्रिक विभागातील ज्युनिअर ऑफिसर सुचिंद्र अनिखिंडी यांनी दिली. बँकेच्या वतीने आळंदी ते पंढरपूर संपूर्ण मार्गावर अनिखिंडी या एटीएमसोबत होते.

ते म्हणाले, ‘गर्दीच्या ठिकाणी नेहमीचे मोठे एटीएम यंत्र नेता येत नाही त्यामुळे बँकेने मायक्रो एटीएम यंत्रासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे (एनपीसीआय) परवानगीचा अर्ज केला. एरव्ही हे एटीएम मिळवण्याच्या प्रक्रियेला 21 दिवस लागतात; पण बँकेचा उद्देश लक्षात घेऊन एनपीसीआयने दोन-तीन दिवसांतच हे यंत्र उपलब्ध करून दिले. त्यानंतर आम्ही 28-29 जूनला ‘टेस्ट रन’ घेतला. संपूर्ण वारी मार्गावर प्रवास करून प्रत्यक्ष व्यवहार (ट्रॅन्झॅक्शन) करून यंत्रणांची रेंज तपासली. त्यावेळेसच वारीत एटीएमची व्हॅन कुठे उभी करायची हे आम्ही निश्चित केले होते’

आळंदीतून ‘श्री गणेशा’

समर्थ सहकारी बँकेच्या मोबाईल एटीएम उपक्रमाचा ‘श्री गणेशा’ आळंदीत इंद्रायणीच्या घाटावर तीन जुलैला झाला. बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन झाले. श्री ज्ञानेश्वर मंदिर संस्थान, आळंदीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, समाजसेवक जयसिंगराव रणदिवे, बँकेचे उपाध्यक्ष राजन जांबोटकर, संचालक अनंत दाते, प्रशांत बडवे, राजेश पटवर्धन, सुनील मदन, अरविंद पंडित, श्रीकृष्ण कालेकर हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मोबाईल एटीएममध्ये होत्या या सुविधा

झिरो बॅलन्स खाते उघडणे – शून्य पैसे खात्यात जमा असतानाही समर्थ बँकेत नवे खाते उघडण्याची सुविधा इथं उपलब्ध होती. त्या व्यक्तीला लगेच ‘रूपे’ एटीएम कार्ड देण्यात येत होते.

पैसे काढणे – देशातील बहुतांश बँकांच्या कार्डांचा वापर करून पैसे काढता येत होते.

अनिखिंडी म्हणाले, ‘ आमच्या बँकेच्या उपक्रमाचा वारकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला. वारीच्या 18 दिवसांच्या काळात सुमारे 3 हजार जणांनी या सुविधांचा लाभ घेत 32 लाख रुपये काढले. 50 जणांनी नवी खाती उघडली. आळंदी ते फलटण या मार्गावर बँकेच्या पुण्यातील शाखांनी तर फलटण-वाखरी मार्गावर सोलापूर जिल्ह्यातील शाखांनी सर्वतोपरी मदत केली. ही सेवा आम्ही वाखरीपर्यंत पुरवली त्यानंतर पंढपुरात बँकेची शाखा आहेच. ज्ञानेश्वर ढवळे, दत्ता होनमाने, प्रकाश वेल्हाळ, दत्ता भोसले, व्हॅन चालक अमोल देशमाने आणि दोन खासगी सुरक्षा रक्षक यांचे सहकार्य लाभले.’

‘रात्रीचे नऊ वाजले होते. आम्ही सेवा बंद करणार होतो. तेवढ्यात एक वारकरी आला त्याच्याकडे पाणी विकत घ्यायलाही पैसे नव्हते. तो मोठ्या आशेनी आला होता. पण एटीएम यंत्राला रेंज नव्हती. मग आम्ही यंत्र एकदा बंद-चालू केले आणि रेंज मिळाली. त्या वारकऱ्याने 2 हजार रुपये काढल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला सगळ्यांना आमच्या प्रयत्नांचे सार्थक झाले असे वाटले. एका वारकऱ्याची पाकिटे वारीत हरवली. त्याने आमच्या बँकेत खाते उघडले. त्यामध्ये पैसे भरायला सांगून त्याने एटीएममधून पैसे काढले. आळंदीत तर आम्हाला असा अनुभव आला की त्यामुळे त्यामुळे आमचा उत्साह दुणावला. एका वारकऱ्याने तयारी म्हणून आळंदीपासूनच दोन वेगवेगळ्या पाकिटांमध्ये 20 हजार रुपये जवळ ठेवले होते. त्याची चोरी झाली तर बोटांत एक तोळ्याची सोन्याची अंगठी घातली होती. पण आमची एटीएम सुविधा आहे कळल्यावर त्या वारकऱ्याने आळंदीतूनच ती सोन्याची अंगठी घरी पाठवून दिली,’ असे अनेक अनुभव अनिखिंडी यांनी सांगितले.

पुढच्या वर्षी अधिक सुविधा

या वर्षीचा मोबाईल एटीएमचा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर त्याचा आढावा बँकेच्या वतीने घेण्यात आला. वारकऱ्यांचा प्रतिसाद पाहून पुढच्या वर्षी आषाढी वारीत फंड ट्रान्स्फर, कॅश डिपॉझिट, मोबाईल रिचार्ज, आधार बायोमेट्रिक सुविधेचा वापर करून बोटांच्या ठशांद्वारे खातेदारांना पैसे मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा बँकेचा विचार सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.