Pimpri: अखेर दापोडी-निगडी बीआरटीएस मार्गावर बस धावणार ! ; न्यायालयाचा हिरवा कंदील

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएस मार्गावर पीएमपीएमल बस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गावरील सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली असून बीआरटीएस सुरु करण्यास न्यायालयाने हिरवा कंदील दर्शविला आहे. मार्गावरील उर्वरित शिल्लक कामे आठ ते दहा दिवसात पूर्ण करुन बीआरटी बस सुरु करण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती बीआरटीएसचे प्रवक्ते तथा उपअभियंता विजय भोजने यांनी शुक्रवारी दिली. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार उपस्थित होते.

नागरिकांना विनाअडथळा जलद प्रवास करता यावा, प्रदूषणमुक्तीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी ‘बस रॅपिड ट्रान्झीट सिस्टम’ अर्थात बीआरटीएस मार्ग उभारण्यात आले आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून मुंबई-पुणे मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प रेंगाळला होता. सन 2010 मध्ये या मार्गाला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार काम सुरु करण्यात आले होते. 2010 मध्ये बस स्थानकासह इतर कामासाठी निधी मंजूर झाला होता. त्यानंतर सन 2011 मध्ये बसथांबे उभारण्याचे काम प्रायोगिकतत्तावर ‘बीव्हीजी’ला देण्यात आले होते. या मार्गावर एकूण 36 बस थांबे आहेत.

दरम्यान, सन 2013 मध्ये बीआरटीएस मार्गावर सुरक्षिततेबाबत उपाययोजना केल्या नसल्याचे कारण देत अॅ. हिम्मतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर पालिकेने सुरक्षिततेबाबत उपाययोजना करुन याचिकाकर्त्यांसोबत मार्गावर तीन वेळा बसची चाचणी घेतली. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने बीआरटीएस बस सुरु करण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे, अशी माहिती भोजने यांनी दिली.

भोजने म्हणाले, “या बीरआटीएस मार्गावर बस संचलन करणे, सुरक्षा वॉर्डन नेमणे याची जबाबदारी पीएमपीएमएल प्रशासनावर आहे. उर्वरित शिल्लक राहिलेली कामे पालिका सात ते आठ दिवसात पूर्ण करणार आहे. आजपर्यंत या कामासाठी 27 कोटी रुपये खर्च आला आहे. या मार्गावरुन 276 बस धावणार आहेत. एका दिवसाला 2200 ते 2300 फे-या होतील. एका मिनिटाला एक बस याप्रमाणे पुणे स्टेशन, मनपा भवन, हडपसर, शेवाळवाडी, वाघोली, कात्रज, अप्पर इंदिरानगर, कोथरुड डेपो, वारजे माळवाडी या मार्गावरील बस धावणार आहेत. बजाज अॅटो, आकुर्डी, काळभोरनर, फुगेवाडी, वल्लभनगर आणि कासारवाडी या सहा ठिकाणी भुयारी मार्ग आहे.

मार्गावरील शिल्लक कामे पूर्ण झाल्यानंतर पोलिसांना एक पत्र देण्यात येणार आहे. बीआरटीएस मार्गातून केवळ बीआरटीच्या बस, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाड्या, मंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्याला परवानी देण्यात यावी. इतर वाहनांना परवानगी देऊ नये. इतर वाहने या मार्गात शिरल्यास पोलिसांकडून दंडाची आकारणी केली जाणार आहे. पालिकेने दंडाची रक्कम ठरवून दिली आहे. महापौर राहुल जाधव यांची परवानगी घेऊन मार्गावर बीआरटीएस बस सुरु केली जाणार आहे” त्यानंतर न्यायालयाला अहवाल सादर केला जाणार असल्याचेही, भोजने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.