Pune : सर्वोच्च गुणवत्ता प्राप्त करण्याचा ध्यास ठेवा – रत्नाकर गायकवाड

राज्यातील अल्पसंख्य समाजातील दहावी परीक्षेतील गुणवंतांचा, सर्वधर्मीय गुणवंतांचा सत्कार

एमपीसी न्यूज- “प्रगतीच्या मार्गात अडथळे येतील, पण, स्वतःवर श्रध्दा ठेवावी. जे क्षेत्र निवडाल, त्यात सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचा ध्यास बाळगा आणि आनंदी रहा. सर्वोच्च गुणवत्ता प्राप्त करायची असेल तर 10 ते 5 काम करण्याचा बाणा बाजूला ठेवला पाहिजे ” असा सल्ला राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी दिला.

राज्यभरातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी, सीख या अल्पसंख्य समाजातील दहावी परीक्षेत यशस्वी गुणवंतांचा तसेच सर्वधर्मीय गुणवंतांचा सत्कार ‘अवामी महाज’ या सामाजिक संस्थेतर्फे तसेच ‘हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आयोजित करण्यात आला होता. यावेळी रत्नाकर गायकवाड बोलत होते. उपक्रमाचे हे 30 वे वर्ष होते.

‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बिशप थॉमस डाबरे, सतसिंग मोखा, लतीफ मगदूम,झुबेर शेख , वाहिद बियाबानी ,सीराज सुतार (निमंत्रक), सय्यद आरिफ अल्ताफ (सह निमंत्रक), मुनव्वर पीरभॉय, शाहीद शेख उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले, ” स्पर्धा आहे म्हणून निराश न होता निरंतर कार्यरत रहा. शिका आणि संघर्ष करा ‘ हा मंत्रच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. त्याच मार्गावर आझम कॅम्पस जोरदार वाटचाल करीत आहे. प्रवाहाच्या विरोधात जाऊन डॉ. पी. ए. इनामदार यांनी दरवर्षी 30 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देणारा कँम्पस उभारला, ते आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत” असेही गायकवाड म्हणाले.

या कार्यक्रमादरम्यान 50 गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यात जैन, ख्रिश्चन, बुद्ध, पारसी, शीख आणि मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचा , सर्वधर्मीय गुणवंतांचा समावेश होता. राज्यातील 9 शालांत परीक्षा मंडळातून ९७ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी निवडण्यात आले होते.

बिशप थॉमस डाबरे, सतसिंग मोखा यांनी मनोगत व्यक्त केले.डाबरे म्हणाले, ‘ मुलांवर प्रेम केले पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.देशात आता बंधुभावाची गरज आहे. देश सर्वधर्मीयांचा आहे. सर्वांनी एकत्र राहून प्रगती केली पाहिजे’

डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, ‘आरक्षणामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतो, हा आरोप चुकीचा आहे. प्रवेशासाठी आरक्षण असले तरी निकालात आरक्षण नसते. समाजाची प्रगती झाली नाही, म्हणून सरकारला दोष देण्याची वृत्ती चुकीची आहे.आम्ही अल्पसंख्य, मागास विद्यार्थ्यांना उमेद देण्याचे काम करीत आहोत’

डॉ. मुश्ताक मुकादम , रोशन आरा आणि रुमाना शेख यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. अयूब शेख यांनी प्रास्ताविक केले.

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.