Sangvi News : जादा मोबदल्याचे आमिष दाखवत महिलेची 65 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ‘तुम्ही मला काही पैसे द्या. मी तुम्हाला त्याच्या बदल्यात जादा मोबदला देऊन तुमचे पैसे परत करतो’ असे म्हणून विश्वास संपादन करून एका दाम्पत्याने महिलेची 65 लाखांची फसवणूक केली. हा प्रकार सन 2017 ते 20 एप्रिल 2021 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला.

संतोष कचरू भांगरे, छाया संतोष भांगरे (दोघे रा. पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सुरेखा दीपक जगताप (वय 47. रा. तापकीरनगर, काळेवाडी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीचे मित्र अनिल अष्टगे यांच्यामार्फत फिर्यादी आणि आरोपींची ओळख झाली. आरोपी संतोष याने ‘तो शेअर मार्केट मध्ये काम करतो. तसेच तो सिव्हिल इंजिनियर आहे. त्याच्या स्वतःच्या जमिनी आहेत. यापूर्वी अनेक जणांनी माझ्याकडे पैसे गुंतवले होते. त्या पैशांचा मला व्यवसायात फायदा झाला.

मी त्यांचे पैसे परत करून त्यांना जादा मोबदला दिला. आता मला पैशाची खूप गरज आहे. तुम्ही मला काही पैसे द्या. मी तुम्हाला त्याच्या मोबदल्यात ज्यादा  मोबदला देऊन तुमचे पैसे परत करतो’ असे म्हणत आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या पतीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पैसे हात उसने घेत असल्याचे लिहून देखील आरोपींनी दिले.

त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपींना 65 लाख 66 हजार 520 रुपये आरटीजीएस आणि रोख स्वरूपात दिले. पैसे घेतल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना त्यांचे पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.