नाटक ” दिनूच्या सासूबाई राधाबाई ” असा दिनू अशी सासू..

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- मराठी रंगभूमीवर विनोदी नाटके सतत येत आहेत, विनोदी नाटकातून करमणूक करीत प्रबोधन सुद्धा केलं जाते हे आपणास नाकारता येत नाही, विनोदी नाटकामध्ये ” फार्स ” हा सर्वसाधारणपणे 1960 च्या सुमारास बबन प्रभू आणि आत्माराम भेंडे यांनी रंगभूमीवर सादर केला, त्यावेळी बबन प्रभू लिखित ” झोपी गेलेला जागा झाला ” आणि ” दिनूच्या सासूबाई राधाबाई ” हे दोन फार्स सादर केले होते त्याकाळी ते खूप गाजले होते, आजच्या घडीला वेद प्रोडक्शनने सादर केलेला आणि विश्वस्मे प्रोडक्शनची निर्मिती असलेला ” दिनूच्या सासूबाई राधाबाई ” हे नाटक रंगमंचावर धमाल करीत आहे.

बबन प्रभू यांचे हे गाजलेलं नाटक संतोष पवार यांनी दिग्दर्शित केलं आहे. नेपथ्य प्रसाद वालावलकर यांनी केलं असून प्रकाश योजना किशोर इंगळे यांची आहे, संगीत साई-पियुष यांचे आहे. यामध्ये नयना आपटे, विकास देसाई, इरावती लागू, रोनक शिंदे, वैभवी देऊलकर – धुरी, ऋतूंधरा माने, दीपश्री कावळे, विनय येडेकर, संतोष पवार या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.

दिनू नाडकर्णी यांच्या घरात हि कथा घडते, दिनूची सासू राधाबाई हि एक इरसाल, भांडण करण्यात पटाईत अशी असून तिचे पती कनैह्या हे दोघे चार महिन्यासाठी दिनूच्या कडे राहायला आलेले असतात, दिनूच्या घरी त्याचा मेव्हणा रवी हा राहायला आलेला असतो, त्याची एक भानगड असते, त्याने हिरा नावाच्या मुलीबरोबर दोन वर्षांपूर्वी लग्न केलेलं असते त्याला एक बाळ सुद्धा असते, दिनूची बायको मीना हि सुस्वभावी पण तिची बहीण प्रीती हिला अभिनेत्री बनायचे असते त्यासाठी मेनकादेवी ह्या अभिनेत्री ला आमंत्रण दिलेले असते, त्यामध्ये रवी-हिरा ह्यांचे लग्न झालेलं आहे कोणालाच माहित नसल्याने घोटाळे, गैरसमज वाढत असतात, सासऱ्याने दिनूकडे आणलेला ऑर्गन दुरुस्ती करण्यासाठी दिनूच्या मित्राने डॉ नाय ने पुढाकार घेतलेला असतो, त्यातून अनेक गैरसमज वाढत जातात, हे नेमके काय काय घडत असते ते मी सांगणार नाही, तुम्हीच अनुभव घ्या.

सासू राधाबाई ची भूमिका नयना आपटे यांनी रंगतदार केली आहे, दिनूच्या भूमिकेत संतोष पवार आणि डॉ नाय च्या भूमिकेत विनय येडेकर मजा आणतात, त्यांना साथ इरावती लागू { मेनका देवी }, दीपश्री कवळे { हिरा }, रोनक शिंदे { रवी }, ऋतुंभरा माने { प्रीती }. वैभवी देऊलकर-धुरी { मीना } यांनी साथ दिली आहे. पळापळ, धावपळ, समज-गैरसमज ह्यातून हे नाटक फुलत असले तरी नाटकाचा पहिला अंक हा बराच लांबलेला जाणवतो, पण दुसरा अंक प्रेक्षकांची पकड घेतो, संतोष पवार यांनी आजच्या काळाला अनुसरून काही योग्य ते बदल करून नाटक दिगदर्शित केलं आहे, संतोष पवार / विनय येडेकर यांच्या अभिनयाच्या जुगलबंदी बरोबरच संपूर्ण नाटकात नयना आपटे यांनी रंगवलेली सासूबाई राधाबाई लक्षांत राहतात. पळापळ-धावपळ-समज-गैरसमज इत्यादींनी नाटक रंगतदार बनले आहे. पूर्वी बबन प्रभू / आत्माराम भेंडे यांचा विनोद वेगळ्या धाटणीचा होता, संवादफेक आणि विनोदाचे अचूक टायमिंग हि खास असायची, आता संतोष पवार / विनय येडेकर यांनी तो बाज आणण्याचा प्रयत्न चांगला केला आहे. नेपथ्य / प्रकाश योजना योग्य अशी असून संगीत सुद्धा चांगले आहे.

एकंदरीत दिनूची कमाल आणि सासूची धमाल असे हे नाटक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.