Moshi : अनधिकृतपणे दिलेले वीजजोड त्वरित काढून घेण्याची मागणी

 

एमपीसी न्यूज- मोशी येथील नवीन आरटीओ कार्यालयाशेजारी प्रिव्हिया बिझनेस सेंटर या व्यावसायिक इमारतीला अनधिकृतपणे वीज कनेक्शन देण्यात आलेले आहे असे सांगत विद्युत वितरण समितीचे सदस्य राहुल कोल्हटकर यांनी सदरचे अनधिकृत कनेक्शन त्वरित काढून टाकण्याची मागणी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे केली. मात्र तक्रार मागे घेण्याबाबत दबाव आणला जात असल्याचा आरोप कोल्हटकर यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत आमदार बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले असून या प्रकरणी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, मोशी येथील नवीन आरटीओ कार्यालयाशेजारी प्रिव्हिया बिझनेस सेंटर नावाची व्यावसायिक इमारत आहे. या इमारतीसाठी एकाच प्लिंथवर 630 केव्हीए आणि 315 केव्हीए असे लघुदाब आणि उच्चदाब वाहिन्यांचे रोहित्र बसविण्यात आले. त्यासाठी सुरक्षेचे कोणतेही उपाय योजना न केल्यामुळे दोन्हीही वीज वाहिन्या धोकादायक अवस्थेत अस्ताव्यस्त पसरल्या होत्या.

या संदर्भात शासनाच्या संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला असता काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. दरम्यान, महावितरणकडून संबंधित रोहित्र काढून टाकण्यात आले. त्यानंतर अन्य ठिकाणाहून या इमारतीला अनधिकृतपणे वीजजोड देण्यात आला. यासंदर्भात कोल्हटकर यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे कामाचा अहवाल मागितला. मात्र तो देण्यात आला नाही. त्याचप्रमाणे माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला असता दिलेल्या मुदतीत माहिती देण्यात आली नाही असा आरोप कोल्हटकर यांनी केला.

प्रिव्हिया बिझनेस सेंटरमध्ये अनधिकृतपणे रोहित्राचे काम करणाऱ्या व्यक्तीच्या मार्फत तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला असेही कोल्हटकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. वरील प्रकरणासारखीच अन्य अनेक प्रकरणे महावितरणच्या भोसरी विभागीय कार्यालयात झाली असून सदरचे काम धोकादायक झाले असून या संदर्भात त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी कोल्हटकर यांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.