Pune – रेल्वेमध्ये चो-या करणारे चार सराईत गजाआड

एमपीसी न्यूज – रेल्वेतील प्रवाशांच्या गर्दीचा आणि झोपेचा फायदा घेऊन चो-या करणा-या चार सराईत गुन्हेगारांना सापळा रचून हावडा पुणे एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून अटक करण्यात आली.

विकी बबनराव लांडगे (वय 21) ,राहुल राजू शिंदे (वय 19), अशोक बाबू लहाने (वय 22) दीपक भगवान खाजेकर (वय 30) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलखुश कुमार महेश पासवान हे (वय 22, रा. बिहार) 8 ऑगस्ट रोजी पहाटे पावणेसहाच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशन येथे उतरत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचा10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरी केल्याची तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार कोपरगावहून अहमदनगर, दौंड, पुणे रेल्वे स्टेशन येथे येऊन काही चोरटे प्रवाशांचे मोबाईल व बॅग चोऱ्या करत असल्याची माहिती पुणे लोहमार्ग गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून चौघांना पुणे रेल्वे स्थानकावर हावडा पुणे एक्सप्रेसच्या जनरल डब्यात पकडण्यात आले.

दरम्यान, या चौघांची कसून चौकशी केली असता त्यांनी रेल्वेतील प्रवाशांच्या गर्दीचा आणि झोपेचा फायदा घेऊन मोबाईल व बॅग चोरल्याचे कबूल केले. तसेच त्यांच्यावर पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे देखील उघडकीस आले. पोलिसांनी आरोपींकडून त्यांनी चोरलेले 17 मोबाईल व 5 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असा एकूण 1 लाख 34 हजार 900 रुपये किंमतीचा माल हस्तगत केला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल दबडे, पोलीस उपनिरीक्षक बबन गायकवाड, पोलीस हवालदार अनिल दांगट, अमरदीप साळुंखे, संतोष चांदणे, जनार्धन गर्जे, निलेश बिडकर, राकेश कोकाटे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, पवन बोराटे, संदीप पवार, भिसे, गाडे,
जगदीश सावंत व पोलीस हवालदार खोत यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.