Chakan : वाळू चोरी; बारा जणांवर गुन्हा दाखल; खेड तालुक्यातील बड्या मंडळींचा समावेश

शेलपिंपळगाव मधील प्रकार

एमपीसी न्यूज- शेलपिंपळगाव (ता. खेड) परिसरातील भीमा नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू चोरी व साठा केल्याप्रकरणी महसूल विभागाच्या तक्रारीवरून दहा जणांवर चाकण ( ता. खेड) पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.21) रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये खेड तालुक्यातील एका बड्या राजकीय नेत्याच्या सख्ख्या भावाचा आणि पुतण्याचा समावेश आहे. महसूल प्रशासनातर्फे पंचनामे करण्यात आले असून येथे साठा करून ठेवण्यात आलेल्या वाळूची किंमत पाच लाख 85 हजार रुपये आहे. पंचनामा केलेली वाळू जप्त करण्यात आली आहेत.

वाळूची चोरी, वाहतूक व साठा केल्याप्रकरणी महसूल विभागाचे मंडलाधिकारी दिलीप नरहरी खोमणे (वय ५२) यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून संजय दत्तात्रय मोहिते, रोहन साहेबराव मोहिते ( दोघेही रा. शेलपिंपळगाव, ता.खेड जि. पुणे) व त्यांचे अन्य दहा साथीदार ( नावे निष्पन्न नाहीत) यांच्यावर भा. दं. वि. कलम 379, 511, 34 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मंडलाधिकारी खोमणे यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या पूर्वी पिंपळगाव तर्फे खेड शिवारात वन जमिनी लगत भीमा नदीपात्रात वरील सर्वांनी संगनमत करून जमीन गट नंबर 2655 मधील गौण खनिज वाळूचे 117 ब्रास उत्खनन केले. प्रत्येकी पाच हजार रुपये ब्रास असा एकूण 5 लाख 85 हजार रुपये किमतीचा माल जेसीबी मशिनच्या साह्याने उत्खनन करून जमीन गट नंबर 2625/1 यामध्ये ढिगारा करून वाळू चोरी करण्याचा प्रयत्न केला. सदर बाबतचा पंचनामा करून बेकायदा उत्खनन केलेली वाळू महसूल विभागाने ताब्यात घेतली आहे. पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल ढेकणे व सुदाम हरगुडे करीत आहेत.

वरदहस्तामुळेच अवैध वाळू उपसा

खेड तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध वाळू उपसा सुरूच आहे. बड्या राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने सुरु असलेल्या या गोरखधंद्यावर अंकुश ठेवण्याचे दिव्य महसूल प्रशासनाच्या समोर आहे. अनेकदा महसूल विभागातील काही मंडळींकडून जुजबी कारवाईचे नाटक होत असल्याने वाळू तस्करांचे आर्थिक संबध वाढल्याचे चित्र आहे. पोलीस विभाग देखील यात सामील असल्याचा आरोप होत असून राजकीय हस्तक्षेप झुगारून धडक कारवाया करण्याची मागणी होत आहे. शेलपिंपळगाव येथे अवैध वाळू उपशाला स्थानिक नागरिकांनी प्रखर विरोध केल्यानंतर झालेल्या राड्यानंतर समोर आल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र संबंधित वाळू चोरी प्रकरणी कारवाई होऊ नये, पकडलेली वाळू कमी दाखवावी यासाठी पडद्याआड मोठ्या हालचाली सुरु होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.