Wakad : कार थांबविण्यास सांगितल्यावरून वाहतूक पोलिसाला मारहाण

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला लावलेल्या वाहनांना एका कारने धडक दिली. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कार चालकाला थांबण्यास सांगितले. यावरून कार चालकासह दोघांनी मिळून वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 30) रात्री आठच्या सुमारास थेरगाव येथील डांगे चौकात घडली.

पोलीस नाईक कुंदन तोतरे (वय 31, रा. पोलीस वसाहत, शिवाजीनगर) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कार चालक सुरज परमार (वय 25, रा. नृसिंह मंदिराजवळ, ताथवडे) आणि बापू डांगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक कुंदन तोतरे हिंजवडी वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. बुधवारी थेरगाव मधील डांगे चौक येथे कार्यरत होते. रात्री आठच्या सुमारास सुरज आणि बापू हे दोघे कारमधून (एम एच 14 / ए व्ही 2020) जात होते. डांगे चौक येथे त्यांच्या कारचा धक्का रस्त्याच्या बाजूला लावलेल्या दोन वाहनांना लागला. त्यामुळे तोतरे यांनी त्यांना कार थांबविण्यास सांगितले. यावरून सुरज आणि बापू या दोघांनी तोतरे यांच्यासोबत वाद घातला आणि तोतरे यांना मारहाण केली. तोतरे करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला, यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.