Pimpri : जन्माष्टमी उत्सवासाठी भाविकांच्या गर्दीने फुलली श्रीकृष्ण मंदिरे

 

एमपीसी न्यूज- आज सर्वत्र कृष्णाअष्टमीचा सण उत्साहात साजरा होत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील श्रीकृष्ण मंदिरात अत्यंत उत्साहात श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला जात आहे. विविध मंदिरातून धार्मिक कार्यक्रमांचे तसेच भजन, कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. निगडीच्या श्रीकृष्ण मंदिरात तसेच आकुर्डी स्टेशनमागील इस्कॉनच्या श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी आज पहाटेपासूनच गर्दी केली आहे.

निगडीच्या इस्कॉनच्या श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसन्न मुद्रा असलेली राधा कृष्णाची मूर्ती सुवासिक फुलांनी आणखीनच खुलून दिसत आहे.

मंदिरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना सातारा, कराड, कोल्हापूर, मंचर, नारायणगाव, यासह विविध भागातील भाविक उपस्थित राहणार आहेत. भाविकांसाठी सोमवारी दिवसभर दर्शन चालू राहणार आहे. संध्याकाळी सात वाजता भजन, आठ ते अकरा राधाकृष्णांचा अभिषेक, रात्री बारा वाजता महाआरती केली जाणार आहे. भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे.

संध्याकाळी शहरातील सार्वजनिक दहीहंडी मंडळातर्फे ठिकठिकाणी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्यामुळे शहरांत सकाळपासूनच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.