Pune – रेल्वेच्या वातानुकूलित वर्गात प्रवास करून तो चोरायचा प्रवासी महिलांच्या पर्स

पुणे लोहमार्ग पोलिसांनी केली अटक; नऊ लाखाचा ऐवज हस्तगत

एमपीसी न्यूज – रेल्वेच्या वातानुकूलित वर्गामध्ये प्रवास करून महिलांच्या पर्स चोरणाऱ्या चोरट्याला अटक करून जवळपास नऊ लाखाचा ऐवज हस्तगत केला आहे. गुन्हे शाखेच्या पुणे लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने आरोपीला रविवारी (दि.2) कर्नाटकमधून अटक केली.

अल्ला बकश महम्मद इस्माईल(वय 19, रा.पशापुरा, गुलबर्गा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी दाखल झालेल्या महिलांच्या पर्स चोरीच्या गुन्ह्याचा तपास चालू असताना आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. ते फुटेज पोलिसांनी खबऱ्यांना दाखविल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2 सप्टेंबर रोजी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोपीकडून चोरीचा तब्बल 8 लाख 98 हजार 200 रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला. आरोपी हा चोरी करण्यासाठी वातानुकूलित वर्गाचे तिकीट काढून प्रवास करत असे. प्रवासादरम्यान डब्यातील महिलांच्या पर्स चोरून फरार होत असे. आरोपीला 12 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास चालू आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक दिलीप साकोरे, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल दबडे, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, पोलीस हवालदार धनंजय दुगाने, पोलीस नाईक सुनील कदम, अनिल कांबळे, सुधाकर जगताप, दिनेश बोरनारे, विक्रम मध्ये, स्वप्नील कुंजीर, सुनील चाटे, विजयपाल सिंग, एच. आर. खोकर, विशाल माने व युवराज गायकवाड यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.