Pune : जाणून घ्या कधी होणार मानाच्या पाच गणपतींची प्राणप्रतिष्ठापना

एमपीसी न्यूज : गेल्या आठवड्याभरापासून शहरात गणरायाच्या स्वागतासाठी पुणेकरांची लगबग सुरू आहे. पण आता उद्या सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. ढोल-ताशांचा निनाद आणि सुमधूर गीतांची वादन करणारे बँड पथके यांच्या सहभागाने मिरवणुका काढून उद्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मानाच्या पाचही गणपतीची प्राणप्रतिष्ठा मध्यान्हापूर्वीच होणार आहे. त्यामुळे मिरवणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

कसबा गणपती : पुण्याचे ग्रामदैवत असलेला मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा 11 वाजून 55 मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक भय्याजी जोशी यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी सकाळी सव्वादहा वाजता उत्सव मांडवापासून मिरवणूक निघणार आहे देवळाणकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, श्रीराम, आवर्तन ढोल ताशा पथक आणि प्रभात बँड पथक मिरवणुकीच्या अग्रभागी असेल.

तांबडी जोगेश्वरी : पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना बांधकाम व्यवसायिक अमोल रायकर यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. शनिवार पेठेतून पारंपरिक चांदीच्या पालखीची मिरवणूक निघेल अशी माहिती मंडळाचे प्रसाद कुलकर्णी यांनी दिली आहे.

गुरुजी तालीम : मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपतीची प्राणप्रतिष्ठापना उद्योगपती आदित्य शर्मा यांच्या हस्ते दुपारी एक वाजता होणार आहे. गणपती चौकापासून सकाळी दहा वाजता मिरवणूक सुरू होणार आहे अशी माहिती मंडळाचे प्रवीण परदेशी यांनी दिली आहे.

तुळशीबाग गणपती : मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीची प्राणप्रतिष्ठापना अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ संस्थान अन्नछत्राचे संस्थापक जन्मेजय राजेभोसले यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. त्यापूर्वी सकाळी दहा वाजता उत्सव मंडपापासून मिरवणूक निघणार असल्याचे मंडळाचे उपाध्यक्ष विनायक कदम यांनी दिली.

केसरीवाडा : मानाचा पाचवा श्री केसरीवाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना डॉक्टर रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. श्री केसरीवाडा गणपतीची मिरवणूक पारंपरिक चांदीच्या पालखीतून निघेल अशी माहिती रोहित टिळक यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.