Pimpri: गणेशोत्सवात संसर्गजन्य रोगांचा प्रसार टाळण्यासाठी खबरदारी घ्या; पालिकेचे आवाहन

79

एमपीसी न्यूज – पावसाने विश्रांती घेतल्याने विषाणूजन्य आजारांच्या वाढीसाठी सध्या पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सवात विषाणूजन्य आजारांचा संसर्ग होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले आहे.

पाऊस आणि वाढत असलेल्या हवेतील गारव्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये या रोगाचा प्रभाव हा दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या नऊ महिन्यात स्वाईन फ्ल्यूने 20 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात 126 स्वाईन फ्ल्यूचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 32 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

उत्सवांच्या काळात आजारांचा संसर्ग टाळण्यासाठी ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी यांपैकी कोणतीही लक्षणे दिसत असल्यास नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. साधा ताप, सर्दी, खोकला या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे आढळल्यानंतर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्ल्यूच्या गोळ्या घ्याव्यात, त्याचबरोबर प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागकडून करण्यात आले आहे.

महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ‘साधा ताप, सर्दी, खोकला ही स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आहेत. लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित डॉक्टरांना भेटावे. त्यांच्या सल्लानुसार गोळ्या घ्याव्यात. स्वाइन फ्लूवरील उपचारांसाठी अत्यावश्यक असलेल्या टॅमिफ्लू औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे’.

HB_POST_24_Oct
HB_POST_END_FTR-A3
%d bloggers like this: